शिवप्रहार न्युज - कॅपॅसिटर हा शेतकऱ्यांचा आधुनिक मित्र- अभियंता उपाध्ये
कॅपॅसिटर हा शेतकऱ्यांचा आधुनिक मित्र- अभियंता उपाध्ये
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- नुकतेच महावितरण मधील सहाय्यक अभियंता श्री. सुजय रामचंद्र उपाध्ये, श्री.अनिल थोरात, कार्यकारी अभियंता यांनी कॅपॅसिटर वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी तयार केलेले काही व्हिडीओ सोशल मिडिया मध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये त्यांनी कॅपॅसिटर म्हणजे नेमके काय? आणि तो नेमकी काय जादू करतो? हे शेतकऱ्यांना पटवून दिले आहे.
श्री. उपाध्ये सांगतात कि, “गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र समजला जातो परंतु, कॅपॅसिटर हा देखील शेतकऱ्याचा आधुनिक मित्र आहे.” खरं तर प्रत्येक मोटार पंपाला कॅपॅसिटर जोडला तर त्याचा शेतकऱ्यांना खुप फायदा होतो. कॅपॅसिटर वापरामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात, जसे कि,
१. शेती पंप मोटारच्या तीनही फेजला सारखे व्होल्टेज मिळण्यास मदत होते.
२. लो-व्होल्टेज असलेल्या ठिकाणी कॅपॅसिटर वापरल्यास, व्होल्टेज वाढण्यास मदत होते.
३. शेती पंप मोटार वापरासाठी कमी करंट लागतो.
४. मोटारने कमी करंट घेतल्याने आपल्या डिपी वरचा लोड कमी होतो आणि डिपीचे आयुष्य वाढते.
५. मोटार, केबल, फेज गरम होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे मोटारचे आयुष्य वाढते.
परंतु दुर्दैवाने अनेक शेतकऱ्यांना कॅपॅसिटर बाबत माहिती नसते, माहिती असली तरी कॅपॅसिटर वापराचे फायदे माहित नसतात किंवा कॅपॅसिटर बाबत अनेक गैरसमज आणि उदासीनता असते. सामान्यपणे कॅपॅसिटर न वापरल्यामुळे साधारण २५ ते ३० % एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वीज वाया जाते. हि वाया जाणारी ऊर्जा हे कधीही भरून न येणारे सामाजिक नुकसान आहे. शिवाय त्यामुळे मोठ्या प्रमाणात निसर्गाची देखील हानी होत असते.
महत्वाच्या बाबी
१. कॅपॅसिटर वापरामुळे मोटार अथवा तिच्या पाणी उपसा क्षमतेवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. उलटपक्षी कॅपॅसिटर वापरामुळे मोटारची क्षमता वाढते.
२. कॅपॅसिटर विकत घेताना शक्यतो नामांकित कंपनीचा विकत घ्यावा.
३. लोकल कंपनी आणि नामांकित कंपनीचे कॅपॅसिटर यात केवळ २०० ते ३०० रुपयांचा फरक असतो परंतु कोणतीही वस्तू चांगल्या कंपनीची घेतल्यास ती जास्त टिकते.
४. अनेक नामांकित कंपन्या आपल्या उत्पादनाला वॉरंटी देखील देतात. बनावट कंपनीचे कॅपॅसिटर जास्त काळ टिकत नाही.
५. कॅपॅसिटर वरील LT ह्या अक्षरांचा अर्थ ‘लो टेन्शन’ असा असतो.