शिवप्रहार न्युज - दिवाळीपूर्वी पेमेंट द्या नाहीतर घरी जा;शेतकरी संघटनेचा अशोकच्या संचालकांना इशारा...
दिवाळीपूर्वी पेमेंट द्या नाहीतर घरी जा;शेतकरी संघटनेचा अशोकच्या संचालकांना इशारा...
श्रीरामपूर- दिवाळी तोंडावर आली असून दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, तसेच ऊस तोडणी मजुरांची देयके वेळेत न दिल्यास येणारा गाळप हंगाम अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे १० दिवसांपूर्वी कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळ व कारखान्याचे व्हॉईस चेअरमन श्री. हिम्मतराव धुमाळ यांचेशी झालेल्या चर्चेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संचालक मंडळाला सूचित केले होते.
गाळप हंगाम २३/२४ ची अंतिम देयके दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात दिनांक २८/१०/२०२४ रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेणार असल्याचे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला कारखान्याच्या संचालक मंडळाने दिले होते. गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी कारखान्याचे चेअरमन श्री. भानुदास काशिनाथ मुरकुटे यांनी जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने पेमेंट करणार असल्याचे जाहीर केले होते.प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीला सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा दराचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक “अशोक” च्या प्रशासनाने नेहमीच केली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्री.जितेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अशोक सहकारी साखर कारखान्यावर नितांत प्रेम असलेल्या सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ही कामधेनू टिकली पाहिजे या भावनेतून आजपर्यंत उसाचा पुरवठा केला आहे.परंतु कार्यक्षेत्राजवळील कारखान्यांनी दिलेल्या ऊस दराच्या तुलनेत “अशोक” चे दर खूप कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकरी वेगळा विचार करण्याच्या मानसिकतेत असल्याचे संचालक मंडळाशी झालेल्या चर्चेत सूचित केले होते. "सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांनी दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ३०० रुपये प्रती टनाप्रमाणे अंतिम पेमेंट वर्ग करा अन्यथा सभासदांप्रती प्रामाणिक नसल्याचे कबूल करून घरी बसा" असा सल्लाही कारखाना प्रशासनाला पाठविलेल्या पत्राद्वारे श्री. भोसले यांनी दिला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र असून दिवाळीपूर्वी ३०० रुपये प्रती टन सभासदांच्या खात्यात वर्ग न झाल्यास होणाऱ्या परिणामांना कारखान्याचे प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे.या पत्राच्या प्रती प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहील्यानगर व साखर आयुक्तांना पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ३००० ₹ पहिली उचल दिली.मात्र स्वच्छ कारभाराचा आव आणणाऱ्या भानुदास मुरकुटे यांनी अशोकच्या सभासदांना २७०० ₹ पहिली उचल दिली. गेल्या ३० -३५ वर्षं सभासद - कामगारांचे रक्त पिण्याचे काम यांनी केले असे सभासद सांगतात .