शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात ०८ गावठी कट्टे व १० काडतुस नगर LCB ने पकडले…
श्रीरामपूर शहरात ०८ गावठी कट्टे व १० काडतुस नगर LCB ने पकडले…
श्रीरामपूर- नगर जिल्हयात अनेक ठिकाणी एखादा दुसरा गावठी कट्टा अनेकदा सापडल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. परंतु, काल श्रीरामपुरात एक दोन नव्हे तर तब्बल ८ गावठी कट्टे नगरच्या गुन्हे अन्वेषन शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून पकडले. यावेळी ८ गावठी कटयांबरोबर १० जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. येत्या दोन-तीन महिन्या नगरपालिकेची निवडणुक होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर तब्बल ८ गावठी कट्टे सापडल्याने शहरातील नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपुरात काही जणांकडे गावठी कट्टे आल्याची गुप्त माहिती एलसीबीचे प्रमुख पीआय अनिल कटके यांना मिळाली. सदर माहितीची खात्री करत जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल संध्याकाळी पोनि. अनिल कटके यांनी आपल्या पथकासह श्रीरामपूर गाठले. त्यांच्याबरोबर सपोनि. राजेंद्र वाघ, सपोनि. सोमनाथ दिवटे यांच्यासह संजय .खंडागळे, बापू फोलाणी, देवेंद्र शेलार, भिमराज खडसे, शंकर चौधरी आदींचे पथक श्रीरामपुरात आले. शहरातील एसटी स्टॅन्ड जवळ असणाऱ्या हॉटेल राधिकाच्या पार्कींगच्या परिसरात आरोपी असल्याची पक्की माहिती समजल्यानंतर याठिकाणी पोनि.कटके आणि त्यांच्या पथकाने सापळा लावला. त्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आल्यानंतर हेच ते आरोपी असल्याची खात्री पटल्यानंतर झडप घालून तिघा जणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे झडती घेतली असता ८ गावठी कट्टे सापडून आले आणि त्याचबरोबर १० जिवंत काडतुसही मिळाले. या आरोपींना तातडीने पोलिसांनी गावठी कट्टयांसह ताब्यात घेतले.
त्यानंतर त्यांना एलसीबीचे पथक नगरला घेवून गेले. हे गावठी कट्टे मध्यप्रदेशमधून आणल्याची प्राथमिक माहिती आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे. पकडलेले आरोपी हे शहरातील बाजारतळ परिसरातील राहणारे आहेत. त्यापैकी राहुल कलाणी, वय २०, अक्षय कलाणी, वय २२, दोघे रा. बाजारतळ तसेच आकाश सिंग नावाचा आणखी एक आरोपी या पथकाने पकडला असल्याचे विश्वसनीय पोलीस सुत्रांकडुन समजले.