शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर शहरात गॅस टाकीचा स्फोट…
श्रीरामपूर शहरात गॅस टाकीचा स्फोट…
श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)-श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोडवर श्रीकृष्ण मंदिराजवळ एका घरात आज सकाळी गॅसचा स्फोट होवून मोठी वित्तहानी झाली. यावेळी लोकांनी तातडीने आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबतची समजलेली अधिक माहिती अशी की, बेलापूर रोडवर गायकवाड वस्तीच्या अलीकडे असणार्या महानुभाव श्रीकृष्ण मंदिराच्या जवळ राजेंद्र एकनाथ काकडे यांचे घर आहे. काकडे हे ड्रायव्हर म्हणून काम करतात.
आज सकाळी काकडे व त्यांच कुटूंब नेहमीप्रमाणे घरात झोपलेले हेाते. त्यांच्या घरातील महिलेने सकाळी उठून नेहमीप्रमाणे पाणी भरून आवरून नंतर देवाच्या समोर दिवा लावल्याचे समजते आणि त्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्या स्वयंपाक खोली मोठा स्फोट झाला. गॅस टाकीचा स्फोट झाल्याने या ठिकाणी घरातील भांडे अस्ताव्यस्थ पडले होते तसेच स्फोटामुळे छतावरील फॅन वाकला होता तर इतर भांडे जळून फुटून सर्वत्र विखुरलेले होते. गॅसच्या टाकीच्या स्फोटामुळे झालेल्या आगीच्या लोळामुळे भिंत आणि घरातील सामान काळे पडले. मांडण्यावर लावलेले डबे या स्फोटात उडून खाली पडले. हा स्फोट इतका मोठा होता की, या स्फोटामुळे काकडे यांचे फ्रिज पुर्णपणे जळून गेले आहे. स्फोट झाल्याचे लक्षात येताच बेलापूर रोडने जाणार्या एका इसमाने तातडीने काकडे यांच्या घराकडे धाव घेतली आणि त्याने पाणी मागवून घेवून या आगीवर पाणी मारून ही आग विझविण्यात मोलाचे कार्य केले. विशेष म्हणजे आग विझवणारा हा अचानक आलेला वाटसरू मात्र, नंतर निघून गेला. तो पुन्हा कोणाला दिसला नाही, असे घटनास्थळावरील लोक सांगतात. हा स्फोट नेमका कशाने झाला? याचे कारण दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु, गॅस लीक होवूनच हा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. काकडे यांच्या घरी मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असल्याने आणि लग्नासाठी बँकेतून आणलेले पैसे या स्फोटाने लागलेल्या आगीत जळून गेल्याने आर्थिक मदतीचे नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.
चौकट-मुलीच्या लग्नासाठी आणलेले पैसे जळाले
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, काकडे यांच्या घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. मुलीचे लग्न असल्याने बँकेतून काकडे यांनी पैसे काढून आणून ते स्वयंपाक खोलीमध्ये एका प्लॅस्टीकच्या डब्यात ठेवले होते. गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने हा डबाही नोटांसह जळाला. 50 हजार रूपये बँकेतून आणि घरी 20 हजार असे 70 हजार रू. जळाल्याचे काकडे यांनी सांगितले.