शिवप्रहार न्यूज - इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या सद्यस्थितीबाबत श्रीरामपुरातील युवा इतिहास अभ्यासकाचा लेख आपल्या वाचकांसाठी....

शिवप्रहार न्यूज - इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या सद्यस्थितीबाबत श्रीरामपुरातील युवा इतिहास अभ्यासकाचा लेख आपल्या वाचकांसाठी....

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या सद्यस्थितीबाबत श्रीरामपुरातील युवा इतिहास अभ्यासकाचा लेख आपल्या वाचकांसाठी....

           सध्या सुरु असलेला इस्रायल-पॅलेस्टाईन वाद हा नवा नाही. पण गेले ७-८ वर्षे या संघर्षाच्या तीव्रतेची मात्रा कमी होती. म्हणजे वर्षातील काही ठरावीक काळात गाझा पट्टीमधुन पेटते बलुन्स इस्रायली भागात सोडले जात असत. वार्याबरोबर हे पेटते फुगे वहात जाऊन कुठेही पडत. त्यामुळे त्या भागातीन शेते आणि काहीवेळा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असत. पण आत्ता नेमके असे काय झालेय की इतका मोठा संघर्ष चालू झालेला आहे. वृत्तपत्रांमधे मी याचे रिपोर्टींग पाहिले-वाचले आणि लक्षात आले की हे लोक सांगतानाच असं सांगत आहेत की पहिले इस्रायलने गाझा आणि हमासवर हल्ला चढवला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून हमासने क्षेपणास्त्रे डागली. वास्तविकता वेगळी आहे म्हणून हा लेखन प्रपंच.

 ज्यू आणि अरब संघर्ष बराच जुना आहे. ज्यावेळी १९४८ साली इस्रायल स्वतंत्र झाला. त्यावेळी पूर्व जेरुसलेम हे अरबांकडे म्हणजेच पॅलेस्टाईनच्या ताब्यात होतं. पण १९६७ मधे जेव्हा ६ दिवसांचं युद्ध झालेलं होतं तेव्हा पूर्व जेरुसलेम, गाझा आणि गोल्डन हाईट्स हे सगळं इस्रायलने आपल्या ताब्यात घेतलं होतं. याला १९४८ ते १९६६ चा इतिहास कारणीभूत आहे. (तो इतिहास नंतरच्या लेखात ). तेव्हापासून जुन्या जेरुसलेमचे इस्रायली सरकारने चार भागात विभाजन केले. मुस्लीम क्वार्टर (अल अक्सा मशीद), ख्रिश्चन क्वार्टर (सपेल्चर चर्च), अर्मेनियम क्वार्टर आणि ज्यूईश क्वार्टर (यात टेंपल माउंटचा काही भाग, अश्रुंची भिंत) असे ते भाग आहेत. सोबत जोडलेल्या जुन्या जेरुसलेमच्या नकाशात हे सर्व पाहता येईल. 

१. या व्यतिरिक्तही पूर्व जेरुसलेममधे एक “शेख जराख”म्हणून भाग आहे की जो अरब बहुल भाग आहे. माउंट स्कुपस, माउंट झिऑन, माउंट ऑफ ऑलिव्ह्ज इ. टेकड्या आहेत. माउंट स्कुपसवरच जेरुसलेम विद्यापीठही आहे. माउंट स्कूपस भागातील बराचसा भाग हा ज्यू सेटलर्स लोकांनी व्यापला आहे. तिथे काही अरब लोक पण राहतात. आता अरब आणि ज्यूंचं विळ्या भोपळ्याचं सख्य आहे. त्यामुळे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून तेथील ज्यू लो्कांनी तेथील अरब लोकांना दुसरीकडे मुसलमान बहुल भागात घरे द्यावीत यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचा निकाल गेल्या ११ मे ला होता.

२. १९६७ च्या युद्धानंतर पूर्व आणि पश्चिम जेरुसलेम ज्यादिवशी एक केलं गेलं त्या दिवसाला "जेरुसलेम डे" असं म्हणतात. ज्युईश कॅलेंडर प्रमाणे तो ९ मे संध्याकाळ ते १० मे संध्याकाळ असा होता. त्या दिवशी जेरुसलेममधे सेलिब्रेशन असतं.      

३. मागच्या हफ्त्यात रामजान चालू होता त्यामुळे अल अक्सा मशीदीमधे मुसलमान लोक नमाज पठणासाठी जमत. नमाज पठणानंतर दमास्कस गेट पाशी एकत्र येत.परंतु कोविड संसर्ग वाढण्याची भिती म्हणून इस्रायली पोलीसांनी पूर्व जेरुसलेम भागात तसेच जुन्या जेरुसलेम मधे दमास्कस गेटपाशी जमाव बंदी तसेच अल अक्सा मशीदीत १०,००० पेक्षा जास्त लोक जमु नयेत असे आदेश जारी केले हो्ते. पण या आदेशांचं पालन केलं गेलं नाही. अल-अक्सा मधे ६०,००० च्या वर लोक नमाज पठणासाठी एकत्र आले. त्यांनी तेथे उपस्थित इस्रायली पोलीसांवर हल्ला चालू केला. यामुळे तिथे संघर्षाची ठिणगी पडली. यात बरेच अरब नागरिक जखमी झाले. या दंगलीत अधिक वाद नको म्हणून ११ मे ला लागणारा न्यायालयाचा वर नमुद निकाल पुढे ढकलण्यात आला. 

          पण हमास तयारीतच होतं. कारण गेली सात वर्षे शांतता असल्याने त्यांची हल्ल्याची सुप्त इच्छा बाहेर आली आणि त्यांनी गाझा मधुन इस्रायलमधील सेदेरोत, अश्खलोन, अश्दोद, लोद, बेरशेव्हा, तेल अविव यांसारख्या शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. सोबत जोडलेल्या इस्रायलच्या नकाशात गाझा पट्टीपासून ही शहरे साधारण किती अंतरावर आहेत याचा अंदाज येईल. या भागातील नागरिक दहशतीच्या छायेतच वावरत आहेत. कोणत्याक्षणी इस्रायलच्या “आयर्न डोम डिफेन्स सिस्टीमचा “ सायरन वाजेल आणि त्यांना बंकर्स मधे जावं लागेल सांगता येत नाही. अनेकंनी घरांमधेच आता शेल्टर रुम्स (म्हणजे क्षेपणास्त्रांपासून वाचवेल अशी खोली) बांधले आहे. त्यामुळे सायरन वाजला की लोकांना गाझापासून त्यांच्या शहराच्या अंतराच्या प्रमाणात शेल्टरमधे जाण्यास वेळ मिळतो. हा कालावधी १५ सेकंद (सेदेरोत, अश्खलोन) -- ४५ सेकंद (अश्दोद) -- ९० सेकंद (तेल अविव, लोद) असा वेगवेगळा असतो. 

                   ह्यावेळी केवळ हमासच नाही तर इस्रायल मधील बर्याच शहरांत अरब आणि ज्यू यांचा संघर्ष रस्त्यांवर आला आहे. स्थानिक अरब हे १००-१५० च्या संख्येने रस्त्यावर येऊन ज्यू लोकांची दुकाने घरे, गाड्या, सिनेगॉग्ज यांची जाळपोळ करतात, घरांवर दगडफेक करतात. तर काही अति कर्मठ ज्यू एकेकट्या अरबांना गाठून चोप देताहेत. इस्रायलमधील लोकांना सीमारेषेच्या बाहेरुन होणार्या क्षेपणास्त्र हल्ल्यांची सवय आहे.सायरन वाजला की बंकरमधे किंवा शेल्टरमधे जाऊन आपला जीव कसा वाचवायचा हे त्यांना माहिती आहे पण इस्रायलमधील शहरांच्या रस्त्यांवरील दंगली हे इस्रायलच्या लोकांना नविन आहे. त्याची त्यांना जास्त भिती वाटतेय.

                या क्षेपणास्त्र हल्ल्यांना इस्रायली हवाई दलाने आणि लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलेले आहे. गेल्या तीन दिवसात इस्रायलने हमासच्या ६ पॉवरफुल नेत्यांना संपवलं असून गाझामधील हमासचे मुख्यालयही जमीनदोस्त केलंय. २०१४ मधे झालेल्या संघर्षातून शहाणे होऊन इस्रायली आर्मी आपले रनगाडे गाझा पट्टीच्या सीमारेषेवरच ठेवून तिथून हल्ला करेल पण गाझा मधे उतरणार नाही. पण हवाई हल्ले, सर्जिकल स्ट्राईक्स चालूच ठेवतील. जोपर्यंत हमास कडील शस्रास्त्रे संपत नाहीत आणि त्यांना दिशा दाखविणारे नेते संपवले जात नाहीत तोपर्यंत हे युद्ध चालूच राहील असे आत्ता तरी वाटत आहे..

आणखी बरीच माहिती जी आपल्या देशाला हितकरक असेल ती आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिकरित्या अप्रत्यक्ष आपल्या देशावर परिणाम करेल ती पुढच्या लेखात...

धन्यवाद

दिपक संत,

युवा इतिहास अभ्यासक.

मो.८९९९९४१८४७,९९७५९७४८८१.