शिवप्रहार न्यूज- एकलहरे शिवारात दोन कुटुंबात तुफान राडा; श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला परस्परविरोधी विनयभंगाचे गुन्हे दाखल...

एकलहरे शिवारात दोन कुटुंबात तुफान राडा; श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला परस्परविरोधी विनयभंगाचे गुन्हे दाखल...
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरालगत असणाऱ्या एकलहरे गावातील जवाहरवाडी परिसरात दोन कुटुंबांमध्ये शेतीच्या जमिनीच्या ताब्यावरुन तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची हकीकत अशी की,एकलहरे गावातील जवाहरवाडी भागात एकाच शेत जमिनीवर दोन कुटुंबांनी दावा सांगितल्याने दोन्ही बाजूने प्रत्येकी दहा ते बारा लोक जमा झाले. यामध्ये दोन्ही कुटुंबातील महिलांचा देखील समावेश होता. सुरुवातीला किरकोळ वाद होऊन शिवीगाळ झाली ,तुम्ही लय माजलेत,तुमची मस्ती जिरवतो, तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असे दोन्ही बाजुने शाब्दिक वाद झाले.
त्यानंतर हे दोन्ही कुटुंबीय एकमेकांना हाणामारी करायला लागले आणि दोन्ही कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली. ज्यामध्ये दोन्ही कुटुंबातील महिलांच्या अंगावर येऊन,कपडे फाडून विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.
तरी दोन कुटुंबात झालेल्या या राड्याबाबत पहिल्या कुटुंबाच्या फिर्यादी नुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 291/2021 भादवि कलम 143,147,354अ,354 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या कुटुंबाने दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 292/ 2021 कलम 143, 147,354,354 अ,354 ब, वगैरे प्रमाणे गुन्हा काल रात्री उशीरा दाखल करण्यात आला आहे.
यातील एका गुन्ह्यातील फिर्यादी हा श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक भागातील रहिवासी आहे तर दुसरा हा शिर्डी भागातील आहे. या दोन्ही कुटुंबांनी ज्या जमीनीवर दावा सांगितला ती जमीन एकलहरे गावातील आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक श्री. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.घायवट हे करीत आहेत.