शिवप्रहार न्यूज- “गाडीला धक्का लागला” म्हणत श्रीरामपुरातील ओव्हरब्रीजजवळ बालमला लुटले…
“गाडीला धक्का लागला” म्हणत श्रीरामपुरातील ओव्हरब्रीजजवळ बालमला लुटले…
श्रीरामपूर (प्रतिनिधी) - लोणी येथून गायी विकून घरी जात असताना श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवर असणाऱ्या ओव्हरब्रीजजवळ एकास मारहाण करून त्याच्याजवळील ७३ हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल लुटून नेण्याची घटना काल दुपारी १.१५ च्या सुमारास घडली.
याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसात बालम हसन पठाण, वय - २८, धंदा - शेती, रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल दुपारी १.१५ च्या सुमारास लोणी येथून आपण ३ गायी विकून त्याचे पैसे घेवून घरी जात असताना श्रीरामपूर येथे ओव्हरब्रिजचे दक्षिण बाजूस शेती महामंडळाच्या शेतातून रस्त्याने जात असताना अचानक मागून दोन मोटार सायकलवर इसम आले.त्यांनी “गाडीला धक्का लागला” असे म्हणत कंबरेच्या बेल्टने आपणास मारहाण सुरू केली आणि आपणाजवळील ७३ हजारांची रोकड आणि मोबाईल चोरून नेला.
याप्रकरणी शहर पोलिसात भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुरनं. ४६८/ २०२२ दाखल झाला असून पुढील तपास पोनि. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई देवरे हे करीत आहेत. सदर गुन्हात पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट देवून तपासासंबंधी आदेश दिले.