शिवप्रहार न्यूज -ग्रामीण भगातील वीजेचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील-ना.तनपुरे ...
ग्रामीण भगातील वीजेचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील-ना.तनपुरे ...
राहुरी/शहर प्रतिनिधी - कोरोना आपत्तीमुळे विकास कामावर जरी मर्यादा आल्या असल्या तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भेडसावणारे विजेच्या प्रश्नाबाबत योग्य त्या सुविधा मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. अशी माहिती राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे यांनी दिली. राहुरी -नगर -पाथर्डी मतदार संघात विजेच्या प्रश्नाचे मोठे आव्हान होते,शेतकऱ्यांना आठ तास पुरेशी वीज मिळत नव्हती ऊर्जा खात्याचा कारभार हातात घेतल्यापासून तालुक्यात जवळपास 100 च्या वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आली आहे.सात्रळ सब स्टेशन वरील लोड जास्त असल्याने या ठिकाणी लिंक लाईन टाकून कानडगाव निंभेरे तुळापूर सह या भागातील गावात शेतकऱ्यांना आठ तास वीज वितरण सुरळीत होत आहे. याचप्रमाणे चेडगाव सबस्टेशन वरूनही लिंक लाईन टाकली गेली आहे. वांबोरी सब स्टेशन ते धामोरी पर्यंत लिंक लाईन टाकल्याने या भागातही पुरेशा दाबाने वीज मिळत आहे.
वावरत ,जांभळी,खडांबे,कानडगाव या नवीन सबस्टेशन ची मंजुरी पूर्ण असून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच ही कामे सुरू होतील याच प्रमाणे आरडगाव, बाभूळगाव सब स्टेशन ची क्षमता वाढविण्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण असून ही कामे त्वरित सुरू होणार आहे.मतदार संघातील डोंगरगण व पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे नवीन सबस्टेशन ची उभारणी सुरू होईल. कोरोनामुळे मर्यादा असल्या तरी येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना पुरेसा दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण रुग्णालय याबाबत आरोग्य मंत्र्यांची योग्य त्या बैठका झाल्या असून कोरोना महामारी मुळे याबाबत पुढील कार्यवाही ला दिरंगाई जरी होत असली तरी तालुक्यासाठी सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.