शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर बाजार समिती (कांदा मार्केट)मधील “संयुक्त बैठकीत”कांद्या संदर्भात महत्वाचे निर्णय….
श्रीरामपूर बाजार समिती (कांदा मार्केट)मधील “संयुक्त बैठकीत”कांद्या संदर्भात महत्वाचे निर्णय….
श्रीरामपूर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मोकळा कांदा विक्रीसाठी आणण्याचा निर्णय घेण्यासाठी बाजार समितीच्या सभागृहात स्वाभिमानी शेतकरी संघटना,व्यापारी प्रतिनिधी व बाजार समिती प्रशासन याचे संयुक्त बैठक घेण्यात आली.
मोकळा कांदा विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच कांद्याचे वजन,ग्रेडिंग,दर ठरवणे व वाहने खाली करण्यासाठीची व्यवस्था यावर चर्चा झाली.
मोकळा कांदा विक्रीचा निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्यांचे कांदा गोणी व गोणी भरण्याची मजुरी तसेच हमाली याचे जवळपास १२० रुपये क्विंटल मागे वाचणार आहेत. कांदा वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिले जाणारे कमिशन बंद होणार असल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावात सरासरी १०० रुपये क्विंटलला फरक पडणार आहे. आवक वाढविण्यासाठी व्यापारी वाहतूकदारांना कमिशन देवून आपल्याकडे आकर्षित करीत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना कांद्याच्या दारात बसत असल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले.
कांद्याचे लिलाव बाजार समितीचे अधिकारी पुकारणार असल्याने तसेच प्रत्येक वाहनातील कांद्याचा लिलाव स्वतंत्रपणे होणार असल्याने व्यापाऱ्यांचा लीलावतील हस्तक्षेप कमी होवून खरेदीची स्पर्धा वाढणार आहे.
यावेळी कांदा विक्रीची नियमावली बनवून बाजार सुरू करण्यावर संघटना ठाम राहिल्याने लासलगाव, येवला व इतर बाजार समित्यांचा अभ्यास करून निर्णय करण्याचे ठरले. मोकळा कांदा विक्रीचा निर्णय झाल्यास नाफेड खरेदी व कांदा निर्यातीलाही चालना मिळणार आहे. छोट्या शेतकऱ्यांचा विचार करून आठवड्यातून दोन दिवस गोण्यांचा लिलाव करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्री. जितेंद्र आबासाहेब भोसले, सुरेश ताके, दत्तात्रय लिप्टे, प्रभाकर कांबळे,संदीप गवारे,किशोर बडाख,अजित राऊत प्रभाकर पटारे तसेच उपसभापती नितीन भागडे,नाना शिंदे, संचालक कैलास बोर्डे,विश्वनाथ मुठे,डॉ. नितीन आसने, डॉ. रामलाल काळे, जितेंद्र गदिया, मनोज हिवराळे,सचिव काळे व कांदा व्यापारी उपस्थित होते.