शिवप्रहार न्यूज- आता सरकारी कार्यालयांवर फडकणार छत्रपतींचा भगवा;सरकारचा नवीन आदेश
आता सरकारी कार्यालयांवर फडकणार छत्रपतींचा भगवा;सरकारचा नवीन आदेश...
मुंबई/ श्रीरामपूर- उद्या असलेल्या 6 जून या युगप्रवर्तक,युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी सरकारी कार्यालयांवर भगवा झेंडा फडकवण्या संदर्भात शासनाने एक नवीन आदेश काढला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने संकीर्ण 20/ प्र क्र.100/आस्था 5 -दिनांक 1 जून 2021 या आदेशान्वये “शिवराज्याभिषेक दिन” हा सर्व गावातील ग्रामपंचायत,सर्व तालुक्यांतील पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालय मध्ये साजरा करण्या संदर्भात कार्यपद्धती प्रदर्शित केली आहे.
यामध्ये शासनाने सांगितले आहे की,पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय यावर “भगवा स्वराज्य ध्वज”फडकविण्यात यावा. हा ध्वज उच्च प्रतीचे सॅटिन असलेली भगवी जरी पताका असावी,तसेच ध्वजाचे माप तीन फूट रुंद व सहा फूट लांब या प्रमाणात असावे. हा ध्वज छत्रपतींचे पंच शुभचिन्हे अलंकृत असावा त्यावर जिरेटोप, सुवर्ण होन,जगदंबा तलवार, शिवमुद्रा,वाघनखे यांचा समावेश असावा.सोबत “शिवशक राजदंड” बाबतही नियमावली या आदेशात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवप्रेमींमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण तयार झाले असून सर्व शिवप्रेमी या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करीत आहे.
श्रीरामपुरातील “शिवप्रहार प्रतिष्ठान” या संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष श्री.चंद्रशेखर (चंदू) आगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील छत्रपतींचा भगवा सरकारी कार्यालय फडकविण्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
छत्रपतींना प्राणप्रिय असणारा असा भगवा ध्वज हा सरकारी कार्यालयांवर फडकाविणे म्हणजे भगव्या समोर नतमस्तक होणार्या प्रत्येकासाठी हा एक गौरवाचा क्षण ठरेल.