शिवप्रहार न्यूज- रस्तालूट करणारी टोळी नगर LCB ने धरली; साडे सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त…
रस्तालूट करणारी टोळी नगर LCB ने धरली; साडे सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त…
नगर- संत तुकाराम साखर कारखाना, मुळशी, जिल्हा पुणे येथुन ऊस तोड मुकादम मजुरीची रोख रक्कम मोटार सायकलवर घरी घेवुन जात असतांना रात्रीचे वेळी करंजीघाटात वाहन आडवुन, मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी ५,००,०००/- रु. रोख रक्कम व इतर मुद्देमालासह जेरबंद केली आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २८/०६/२०२२ रोजी फिर्यादी संतोष शहादेव बर्डे वय ३६, धंदा ऊसतोड मुकादम व शेती, रा. भिलवडे, ता. पाथर्डी, जिल्हा नगर हे त्यांचे भाऊ साक्षीदार बबन असे संत तुकाराम साखर कारखाना, मुळशी, जिल्हा पुणे येथुन त्यांचे कामकाजाचे ५,७०,०००/- रु. रोख व अजिनाथ कारभारी मिसाळ यांचे कामकाजाचे २,००,०००/- रु. रोख असे एकुण ७,७०,०००/- रु. रोख रक्कम मोटार सायकलवर घेवुन घरी येत असतांना करंजीघाट, ता. पाथर्डी येथे दर्ग्याजवळ त्यांचे पाठीमागुन एक स्कॉर्पीओ गाडी येवुन मोटार सायकलला कट मारुन स्कॉर्पीओ आडवी लावुन गाडीतील अज्ञात तीन इसमांनी मारहाण करुन, धाक दाखवुन मोटार सायकलचे डिकीमध्ये ठेवलेली वरील रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली आहे. सदर घटने बाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. ६५३ / २२ भादविक ३९४, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. डॉ. बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी व मा. मनोज पाटील, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन आरोपींचा तात्काळ शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत पोनि. अनिल कटके यांना सुचना व मार्गदर्शन केले.सुचनेप्रमाणे अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपासा बाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे पथकाने मोटार सायकल आडवुन, मारहाण करुन जबरी चोरी करणा-या आरोपीतांची माहिती घेत असतांना पोनि/कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा पप्पु दराडे याने केला असुन, तो आता पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी येथे त्याचे राहते घरी आलेला आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थागुशा पथकातील पोसई/सोपान गोरे, सफौ/ मनोहर शेजवळ, पोहेकॉ संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/संतोष लोढे, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, दिपक शिंदे, विश्वास बेरड, पोकॉ/ योगेश सातपुते, सागर ससाणे व चापोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळुन पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी येथे जावून मिळालेल्या माहिती वरुन आरोपीचे घरा जवळ सापळा लावुन थांबलेले असतांना एक संशयीत इसम येतांना दिसला त्यास शिताफीने ताब्यात घेवुन नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) प्रविण ऊर्फ पप्पु दिलीप दराडे, वय ३२, रा. पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वरील नमुद गुन्हयाबाबत चौकशी केली असता तो सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यास अधिक विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने नमुद गुन्हा हा त्याचा साथीदार आंबादास नागरे, तात्याबा दहिफळे व दत्तु सातपुते असे सोबत मिळुन केल्याची कबुली दिली. पथकाने नमुद आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी जावुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव २) आंबादास नारायण नागरे, वय ३१, रा. पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी, ३) तात्याबा पोपट दहिफळे वय ३३, रा. महिंदा, ता. आष्टी, जिल्हा बीड व ४) दत्तु बाबादेव सातपुते वय ३४, रा. निपाणी जळगांव, ता. पाथर्डी असे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यात चोरीस गेलेली ५,००,०००/- रु. रोख तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली १२,००,०००/- रु. किंची महिंद्र स्कॉर्पीओ व ४०,०००/-रु. किं.चे चार मोबाईल फोन असा एकुण १७,४०,०००/- रु. किंचा मुद्देमाल काढुन दिल्याने तो जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पो.स्टे.ला हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही पाथर्डी पो.स्टे. करीत आहेत.
सदरची कारवाई मा. मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व सुदर्शन मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.