शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात मोबाईलवरील लिंक दाबताच अनेकांच्या खात्यातील पैसे गायब…
श्रीरामपुरात मोबाईलवरील लिंक दाबताच अनेकांच्या खात्यातील पैसे गायब…
श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज) - ग्राहकाला आकर्षित करणारी लिंक पाठवून ती लिंक दाबल्यावर खात्यातील पैसे गायब होण्याचा प्रकार श्रीरामपुरात दोन- तीन जणांच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये बोटं घालण्याचा मोह टाळला नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं, हे आता या निमित्ताने पुढे आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सद्या श्रीरामपूर आणि परिसरात मोबाईलवर 'बीआरएस महिला उद्योग ॲप' तसेच 'लाईट बिल भरण्यासाठीचे ॲप' अशा वेगवेगळ्या नावाने काही लोकांना मेसेज आले. ज्यांना सायबर क्राईमची माहिती आहे त्यांनी बोटं घालणं टाळलं. परंतु ज्यांना याबाबत अज्ञान आहे त्यांची फसवणूक झाल्याचे दिसून आले. श्रीरामपूर शहरातील एका महिलेला 'बीआरएस महिला उद्योग ॲप' या नावाने एक लिंक आली. ही लिंक दाबल्यानंतर महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणि आकर्षक असे आमीष दाखवण्यात आले होते. त्यामुळे या महिलेने ही लिंक दाबली. लिंक दाबताच महिलेच्या खात्यातील ५० हजार रूपये गायब झाले. त्यानंतर मोरगेवस्ती परिसरात राहणाऱ्या एकाला 'लाईट बिल भरण्यासाठीचे ॲप' त्याच्या मोबाईलवर आले. लाईट बिल भरायचे म्हणून या तरूणाने सदर लिंकवर क्लिक केले आणि त्या तरूणाच्या खात्यातील ९९ हजार क्षणार्धात गायब झाले. 'महिला उद्योग, सोलर स्किम' या शिवाय विविध नावाने लोकांना आकर्षित करत कमी कष्टात बसल्याबसल्या पैसे कमवण्याचे आमीष दाखवले जाते आणि या आमीषाला बळी पडून मोबाईलवर आलेल्या या लिंकला क्लिक करत अनेकजण फसले जात आहेत.
सद्या सायबर क्राईम प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. यापूर्वी फोन करून कर्जाचे आमीष दाखवून वेगवेगळे क्रेडिट कार्डचे आमीष दाखवून मोबाईलवर आलेला ओटीपी मागवला जायचा आणि हा ओटीपी दिल्यावर लोकांच्या खात्यातून पैसे गायब व्हायचे. आता तर फक्त लिंक पाठवली जाते आणि त्या लिंकवर फक्त बोट दाबले की लगेच खात्यातील पैसे गायब होत आहे. अशी रोज कित्येक लोकांची यामध्ये फसवणूक होत आहे. एखाद्याचे फेसबुक अकौंट हॅक करून त्याद्वारे ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवून आणि त्याबरोबर लिंक पाठवूनही फसवणूक केली जात आहे. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने मेसेज आला किंवा लिंक आली तरी अशी कोणतीही लिंक कोणीही मोबाईलवर बटण दाबून क्लिक करू नये. अन्यथा मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे असे आवाहन जागरूक नागरीकांनी केले आहे.