शिवप्रहार न्युज - प्रवरा नदीत बुडून मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू...
प्रवरा नदीत बुडून मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू...
टाकळीभान (शिवप्रहार न्युज)- टाकळीभान जवळील नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील प्रवरा नदीपात्रात अंघोळीसाठी पोहायला गेलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली किरण सुरेश देठे वय- २८, रा. पाचेगाव, ता. नेवासा व त्यांचा भाचा अनुज प्रवीण भालेराव वय- १०, रा. खोसपुरी, ता. अहिल्यानगर अशी पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या मामा- भाच्याची नावे आहेत.
मयत अनुज भालेराव याला पोहता येत नव्हते. नुकताच तो आई- वडिलांसोबत दिवाळी सणासाठी पाचेगाव येथील मामाकडे आला होता. अंघोळीसाठी ते प्रवरा नदीवर गेले होते. तेथे पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. गावातील स्थानिक तरुणांनी मासेमारीचे साहित्य वापरून अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर पाण्यातून दोघांना बाहेर काढले.
यावेळी घटनास्थळी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर काल रात्री उशिरा दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मामा-भाच्या बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.