शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरातील डॉक्टरची बिट क्वॉईन घेवून फसवणूक...
श्रीरामपुरातील डॉक्टरची बिट क्वॉईन घेवून फसवणूक...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- खोटी कंपनी सुरू करून श्रीरामपुरातील डॉक्टरला जादा व्याजाचे आमीष दाखवून त्याच्याकडून बिट क्वॉईन घेवून त्याची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलीसात पुणे येथील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डॉ. राम मोहनलाल कुकरेजा, रा. कुकरेजा कॉम्प्लेक्स, स्टेट बँकजवळ, श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली ऑनलाईन फोनद्वारे पुण्यातील अमित भारद्वाज नावाच्या इसमाशी ओळख झाली. आरोपी याने आपल्याशी संपर्क करून माझी जीबी मायनिंग कंपनी असून तुम्ही माझ्याकडे तुमचे बिट क्वॉईन इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला या गुंतवणूकीचा परतावा म्हणून १० टक्के बिट क्वॉईन देईल, असा विश्वास भारद्वाज याने दिला. त्याच्यावर विश्वास ठेवून आपण त्यांच्याकडे १७ बिट क्वॉईनपैकी अमित भारद्वाज याच्या कंपनीला १२.२२८३ बिटक्वॉईन ऑनलाईन ट्रान्सफर केले. सदर बिटक्वॉईन इन्व्हेस्टमेंटचा मोबदला म्हणून भारद्वाज याने सुरूवातीचे सहा महिने डॉ. कुकरेजा यांना १० टक्के मोबदला दिला. त्यानंतर मोबदला बंद केला. म्हणून डॉक्टरांनी भारद्वाज याला अनेकदा संपर्क केला परंतु, त्याने ऑनलाईन कॉल करून दाद दिली नाही.
याबाबत सदर आरोपी व त्यांची जी.बी. मायनिंग कंपनीवर पुणे येथे तक्रार दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आरोपीला पुणे पोलिसांनी अटकही केली. आरोपी अमित भारद्वाज याने फिर्यादी डॉ. कुकरेजा यांच्या खात्यावरील बिटक्वॉईन ताम्बी पहिली, आरोपी क्र. २ नेहा भारद्वाज, आरोपी क्र. ३ अजय भारद्वाज व आरोपी क्र.४ विवेक भारद्वाज यांच्या नावावर ट्रान्सफर करून सदर बिट क्वॉईन रक्कम हडपण्याचा व आपली फसवणूक करण्याचा इरादा ठेवून ते ट्रान्सफर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरील चारही आरोपींनी संगनमत करून खोटी कंपनी सुरू करून आपल्या बिट क्वॉईनची परस्पर विल्हेवाट लावली असल्याचे फिर्यादीत म्हटले असून सदर तक्रार सायबर सेलकडे दिल्यानंतर पोलिसांनी फिर्याद नोंदवली नाही म्हणून श्रीरामपूर न्यायायालयात डॉ. कुकरेजा यांनी धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी अमित भारद्वाज, नेहा अजय भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक एम. भारद्वाज, सर्व रा. विश्वधायरी, पुणे यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.