शिवप्रहार न्यूज- श्रीरामनवमी उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने उत्साही वातावरणात सांगता…
श्रीरामनवमी उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने उत्साही वातावरणात सांगता…
शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शनिवार, दिनांक ०९ एप्रिल २०२२ पासुन सुरु झालेल्या श्रीरामनवमी उत्सवाची सांगता ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साही वातावरणात झाली.
आज उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी ०७.०० वाजता गुरुस्थान मंदिरात संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती संजय धिवरे सहआयुक्त प्राप्तिकर विभाग, नासिक यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. तर सकाळी ०७.१५ वाजता संस्थानच्या विश्वस्त श्रीमती अनुराधाताई आदिक यांनी सहपरिवार समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली.
दुपारी १२.०० वाजता ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपाध्यक्ष अॅड.जगदिश सावंत, विश्वस्त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सुरेश वाबळे, डॉ.एकनाथ गोंदकर, महेंद्र शेळके, संजय धिवरे सहआयुक्त प्राप्तिकर विभाग नासिक, प्र.उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, कर्मचारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायं.०६.०० वाजता विश्वस्त जयंतराव जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.जान्हवी जाधव यांच्या हस्ते श्रींची पाद्यपुजा करण्यात आली. सायं ०६.३० वाजता धुपारती झाली. सायं.०७.३० ते रात्रौ ०९.५० यावेळेत अक्षय आयरे, मुंबई यांचा सुस्वागतम रामराज्य नृत्य-नाटिका हा कार्यक्रम श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला. तर रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती झाली.
श्रीरामनवमी उत्सवाच्या कालावधीत श्री साईप्रसादालयात सुमारे ०१ लाख ७५ हजार भाविकांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर सुमारे ०२ लाख २० हजार लाडू प्रसाद पाकीटांचा व अल्पोहार म्हणुन सुमारे ०१ लाख १५ हजार नाष्टापाकीटांचा भाविकांनी लाभ घेतला. याबरोबरच श्री साईआश्रम, श्री साईबाबा भक्तनिवासस्थान, व्दारावती व श्री साईप्रसाद निवासस्थान आदी निवासस्थानांच्या माध्यमातुन सुमारे १८ हजार ५०० भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आली होती. तर उत्सवानिमित्त मुंबईसह राज्याच्या कानाकोप-यातुन आलेल्या ५३ पालख्यांतील सुमारे १० हजार पदयात्रींची श्री साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवास व्यवस्था करण्यात आली होती.
उन्हाची तीव्रता लक्षात घेवून संस्थानच्या वतीने मंदिर व मंदिर परिसरात तसेच मंदिरालगतच्या मार्गांवर मंडप उभारण्यात आले होते. तर दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवली होती. साईभक्तांच्या अतिरिक्त निवासव्यवस्थेकरीता साईबाबा भक्तनिवासस्थान (५०० रुम) व साईधर्मशाळा आदी ठिकाणी बिछायत व कनातीसह मंडपाची उभारणी करण्यात आली होती. तसेच मुंबई व परिसरातुन पालखी सोबत येणा-या पदयात्रींची निवा-याची सोयीसाठी मुंबई ते शिर्डी महामार्गावर ठिकठिकाणी कापडी मंडप उभारण्यात येवुन या ठिकाणी विद्युत व पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. याबरोबरच मुंबई-शिर्डी महार्गावर पालखीतील पदयात्रीकरीता ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टॅकरची व आवश्यकतेनुसार तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी म्हणुन फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते.
श्रीरामनवमी उत्सव यशस्वीरित्या पारपाडण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी व शिर्डी ग्रामस्थांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपाध्यक्ष अॅड.जगदिश सावंत व सर्व विश्वस्त यांनी धन्यवाद दिले.