शिवप्रहार न्यूज- शिर्डीत साईचरित्रावर आधारित विविध स्पर्धा संपन्न…
शिर्डीत साईचरित्रावर आधारित विविध स्पर्धा संपन्न…
शिर्डी -
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईचरित्रावर आधारीत प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व, वेशभूषा, साईभजन गायन या सारख्या स्पर्धा आयोजित करण्यात येतील असे प्रतिपादन संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित श्री साईचरित्रावर आधारीत प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व, वेशभूषा, साईभजन गायन या सारख्या विविध स्पर्धाच्या बक्षीस वितरण समारंभात संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, विश्वस्त सर्वश्री अनुराधा आदिक, ॲड. सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे पुढे म्हणाले की, श्री साईचरित्रावर आधारीत प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व, वेशभूषा, साईभजन गायन या सारख्या स्पर्धा आयोजित करून ख-या अर्थाने श्री साईबाबांच्या शिकवणीची रुजवण विद्यार्थ्यांमध्ये झाल्याचे पाहून खूप छान वाटले. त्यामुळे श्री साईबाबा संस्थान श्री साई चरित्रावर आधारीत विविध स्पर्धा दरवर्षी घेणार आहे. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत म्हणाल्या की, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिलेला साईबाबांचे शिकवणीचा संदेश ऐकून मी भारावून गेले आहे. खूप छान प्रकारच्या स्पर्धा संपन्न झाल्या असून यापुढे या स्पर्धांसाठी संस्थान प्रशासन पुढाकार घेऊन यथोचितरीत्या सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी तत्पर असेल.
या प्रकारे स्पर्धा व्हाव्यात अशी कल्पना मांडणारे विश्वस्त जयवंतराव जाधव यांनी प्रास्ताविकपर मनोगतात स्पर्धा घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. या स्पर्धेत भाग घेतलेल्या दोन हजार विद्यार्थ्यांच्या कुटुंबात म्हणजेच सुमारे पंधरा हजार भक्तांना श्री साईबाबांचे संदेशाची जाणीव व रुजवण झाली. यातून श्री साईबाबांची शिकवण समाजाला कळण्याचा उद्देश फलित झाला असे म्हणावे लागेल, असे श्री.जाधव यांनी प्रतिपादन केले. विश्वस्त सुरेश वाबळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या समारंभात १७५ विद्यार्थ्यांना पारितोषिक रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि दैनंदिन साईबोध देऊन गौरविण्यात आले. मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे, आसिफ तांबोळी, शिल्पा पुजारी, अभयकुमार दुनाखे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन केले. अध्यापक राजेंद्र कोहोकडे, अजिंक्यदेव गायकवाड, सुनिल कांडेकर, विजयकुमार देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. तर प्राचार्य विकास शिवगजे यांनी आभार व्यक्त केले.