शिवप्रहार न्यूज- गुन्हेगारीचे बंध तोडुन 'कृषीक्रांती' घडवणाऱ्या पारधी कुटुंबाचा पोलीस निरीक्षांकडून सत्कार…

शिवप्रहार न्यूज- गुन्हेगारीचे बंध तोडुन 'कृषीक्रांती' घडवणाऱ्या पारधी कुटुंबाचा पोलीस निरीक्षांकडून सत्कार…

गुन्हेगारीचे बंध तोडुन 'कृषीक्रांती' घडवणाऱ्या पारधी कुटुंबाचा पोलीस निरीक्षांकडून सत्कार…

कर्जत दि.२४

       'पारधी' हा शब्द कानावर पडला तरी अनेकांच्या नजरा द्वेषाने भिरभिरतात. खरय ना? मग क्षणात नजरेसमोर उभी राहते खून,दरोडे,चोऱ्या,घरफोड्या अशा गंभीर गुन्ह्यांची भलीमोठी यादी..! पारधी म्हणजे 'गुन्हेगार' असाच शिक्का त्यांच्यावर ठामपणे मारला जातो आणि साहजिकच, समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना कुणीच सामील करून घेत नाही.पण कर्जत तालुक्यातील दगडी बारडगावात एका पारधी समाजाच्या शेतकऱ्याने गुन्हेगारीचे बंध तोडून माळरानावर फुलवलेली द्राक्षशेती पारधी समाजालाच नव्हे तर अवघ्या मानवी समाजातील सर्वच जातींना आदर्श घालून देणारी ठरली आहे.एरव्ही गुन्हेगारीमुळे बदनाम झालेल्या पारधी कुटुंबांच्या हातात बेड्या ठोकण्याऐवजी चक्क डोक्यांवर फेटा अन् हातात नारळ देण्याचे आगळे-वेगळे दिशादर्शक काम 'यशोगाथा' उपक्रमातून एका उपक्रमशील पोलीस निरीक्षकाने केले तर? कुणाला नवल वाटायला नको. 

       ही कहाणी आहे शशिकांत टिकल्या चव्हाण या पारधी समाजातील परिवर्तनवादी शेतकऱ्याची. काबाडकष्ट करून माळरानावर अगदी हिऱ्यांसारख्या मण्यांची द्राक्षबाग फुलावणाऱ्या आणि विशेष म्हणजे कुटुंबातील मुलांनाही बी.ए.बी.एड, एम.ए.डी.एड असे उच्च शिक्षण देऊन सन्मानाने जगणाऱ्या पारधी कुटुंबाची! भर उन्हात घरासमोर अचानक उपक्रमशील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची गाडी येऊन थांबते, यादव गाडीतून खाली उतरतात. गुन्हेगारांना अटक करून नेण्यासाठी हातात असलेल्या बेडयांऐवजी सन्मान-सत्काराचे फेटे अन् नारळ पाहून चव्हाण पारधी कुटुंबही गडबडून जाते.'आज ही खाकी तुमच्या सन्मानासाठी उभी आहे,तुमचे काम पाहून गुन्हेगारीच्या वाटेवर असणारे सन्मानाने जगतील,तुमच्या कामाची प्रेरणा मिळेल' यादव यांच्या या वाक्यांनी 'पोलीस' आणि 'पारधी' हा जणु गोष्टीतल्या चोर-पोलिसाचा डाव आनंदाश्रूंनी अक्षरशः कोलमडून पडला होता.एकरात फुलवलेली द्राक्षबाग पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह सर्वांनी फिरून पाहिली. एकेकाळी धान्य-फळे चोरी करून आपली उपजीविका भागवणारा पारधी समाज आज सर्वांनाच स्वतः पिकवलेल्या द्राक्ष खाण्याचा आग्रह करत असेल तर तो आनंद वेगळाच.अडीच दशकांपूर्वी म्हणजे तब्बल पंचवीस वर्षांपुर्वी भाऊसाहेब वाकळे या शेतकऱ्याने पारधी कुटुंबाला ही जमीन विकत दिली.पारधी कुटुंबाला जमीन देणे हे त्याकाळीही धाडसच. त्या जमीन खरेदीचा किस्सा स्वतः तत्कालीन जमीन मालकाच्या तोंडून ऐकून चंद्रशेखर यादवांनाही कुतूहल वाटले. शशिकांत चव्हाण हे पारधी कुटुंबातील असल्याने त्याकाळी ससे तसेच अन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी या शेतात यायचे. त्यावेळी 'असले प्रकार बंद करून मोलमजुरी करून इथेचका राहत नाही' असा सल्ला मुळ मालक वाकळे यांनी दिला होता. मात्र जमीन घेण्यासाठी इतके पैसे मी कुठून आणणार? असा केविलवाणा प्रश्न चव्हाण यांनी केला होता.त्यावेळी वाळके यांनी पारधी कुटुंबाच्या नावावर उधारीवरच जमीन करून दिली होती.आणि या जमीनीची ठरलेली रक्कम देण्यासाठी सुमारे बारा वर्षांचा कालावधी लागला होता.वाकळे यांच्या मोठेपणामुळे व विश्वासामुळे आज हे पारधी कुटुंब सन्मानाने जीवन जगत आहे. पारधी कुटुंबाला माणुस म्हणुन जगण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या भाऊसाहेब वाकळेंचाही यादव यांनी सन्मान केला.तमाम पारधी समाजाला इमान-इतबाने राहण्याचा गोडवाच त्यांनी आपल्या द्राक्ष शेती व्यवसायातून दिला आहे.

      यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पत्रकार विजय सोनवणे,दत्ता उकिरडे, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते,मनोज लातुरकर, ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संविधान प्रचारक तुकाराम पवार,भाऊसाहेब वाकळे,गणेश कदम आदी उपस्थित होते.

*गुन्हेगारीच्या 'कडू' कहाणीला असा आला 'द्राक्षाचा गोडवा'*

         मुळ शेतमालक भाऊसाहेब वाकळे यांनी २५ वर्षांपुर्वी उपजीविकेसाठी एवघ्या ५ हजार ३०० रुपयांत एकरभर जमीन पारधी कुटुंबाला दिली होती.जमिनीचा सौदा झाला खरा पण, जवळ पैसेच नसल्याने बाजारातून बोकड विकत आणुन ते मोठे करून विकून आलेल्या नफ्यात जमेल तसे पैसे देऊन तब्बल १२ वर्षानंतर जमिनीचा व्यवहार पुर्ण झाला आणि आज द्राक्षबागेबरोबरच हे कुटुंबही तेवढ्याच सन्मानाने भक्कमपणे उभे आहे.

*चंद्रशेखर यादवांचा 'यशोगाथा' उपक्रम प्रेरणा देणारा!*

       पक्के घर, शिक्षण,शासकीय सुविधांपासून कोसो दूर असलेल्या पारधी समाजाला नेहमी हीनतेने पाहिले जाते. मात्र जेंव्हा हा समाज मुख्य प्रवाहात येईल शिक्षण व व्यवसायातून प्रगती साधेल तेंव्हा गुन्हेगारीचा शिक्का पुसला जाईल.अशा कुटुंबांची यशोगाथा अन्य पारधी कुटुंबांपर्यंत पोहोचावी व त्यांनाही प्रेरणा मिळावी यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा हा 'यशोगाथा' उपक्रम त्याचाच एक भाग आहे.