शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरात PSI ला पोलिस स्टेशनमध्येच मारहाण; तिघांना अटक…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरात PSI ला पोलिस स्टेशनमध्येच मारहाण; तिघांना अटक…

श्रीरामपूरात PSI ला पोलिस स्टेशनमध्येच मारहाण; तिघांना अटक…

श्रीरामपूर- अपहृत मुलीचा शोध लागल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी पोलिस तपासाबाबत जाब विचारला. यावेळी तपासी अधिकारी उपनिरीक्षक समाधान सुरवाडे व नातेवाइकांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संबंधित मुलीच्या नातेवाइकांनी उपनिरीक्षक सुरवाडे यांना धक्काबुक्की करीत जखमी केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा १३ फेब्रुवारी रोजी शहर पोलिसांत नोंदविण्यात आला होता. त्याचा तपास सुरवाडे यांच्याकडे होता. या मुलीच्या शोधासाठी सुरवाडे पोलिस नाईक किरण पवार, हवालदार तुषार गायकवाड यांच्यासह १० मे रोजी पुण्याला गेले होते. तेथून संबंधित मुलगी शिर्डी येथे गेल्याची माहिती मिळाली.     

       त्यानुसार शिर्डीचे सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांनी अपहृत मुलीचा शिर्डी परिसरात शोध घेतला. साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ४ जवळ तिच्या वडिलांना ती सापडली. तिला श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आणले.काल (ता. १२) दुपारी बाराच्या सुमारास सदर गुन्ह्यातील अपहृत मुलीचा जबाब नोंदवीत असताना वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी मुलीचे नातेवाईक कक्षामध्ये आले. त्यांतील एकाने, मुलीची वैद्यकीय तपासणी तुम्ही का करत नाही, असा सवाल केला. त्यावर पोलिस उपनिरिक्षक सुरवाडे यांनी सांगितले की, वीज पुरवठा खंडित झालेला असून वैद्यकीय तपासणी बाबत मेमो प्रिंट काढली की लगेच पाठवतो. त्यानंतर आरोपी नातेवाईक व सुरवाडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. 

     त्यानंतर तिघांनी मिळून सुरवाडे यांना मारहाण करीत जखमी केले. यावेळी पोलिस ठाण्यात व कक्षामधील नेमणुकीस असलेले अंमलदार सोमनाथ गाडेकर, पोलिस शिपाई भारत तमनर, महिला पोलिस शिपाई योगिता निकम, सरग, ठाणे अंमलदार आलम पटेल, हवालदार पोपट भोईटे, नागरिक सुनील मुथा व सुभाष जंगले यांनी मध्यस्थी करत सुरवाडे यांची सुटका केली. यात गाडेकर यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. 

      याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान अशोक सुरवाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी विजय गुलाब माळी,ओंकार भरत गायकवाड, पवनसिंग केशवसिंग यांचेविरुध्द भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.