शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यात ऊसाच्या थळातील ३ बैलगाड्या जळून खाक…
श्रीरामपूर तालुक्यात ऊसाच्या थळातील ३ बैलगाड्या जळून खाक…
श्रीरामपूर- तालुक्यातील टाकळीभानमध्ये आज दुपारच्या सुमारास ऊसाच्या थळातील ३ बैलगाड्या जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, ऊस वहातुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रालीला वीज प्रवाह सुरु असणाऱ्या दोन तारा तुटून तारांचे घर्षण होवुन वीजेचा लोळ खाली पडून पाचरटाने पेट घेतला. या आगीचा डोंब होवुन ऊस घेवुन जाणारी भरलेली ट्राॅली उसाच्या थळात सोडलेल्या तीन बैलगाड्या आगीच्या भक्षस्थानी पडुन जळुन खाक झाल्या. मदतकार्य करणाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
टाकळीभान शिवारातील जगताप वस्ती परीसरातील गट नंबर ३२४ मध्ये भाजपाचे मुकुंद राजाराम हापसे यांची ऊसाची शेती आहे. सध्या या उसाची तोडणी अंतिम टप्यात सुरु होती. शेवटच्या टप्यातील ऊसतोडणी करुन ऊसाची शेवटची खेप भरुन ट्रॅक्टर दोन ट्राॅल्या घेवुन उसाच्या थळाच्या बाहेर निघत होता. माञ लोंबकळलेली वीजेची तार ऊस भरलेल्या ट्रेलरला अडकल्याने तार तुटली. त्यामुळे तारेला तार लागुन घर्षण झाल्याने जाळाचा मोठा लोळ खाली पाचरटात पडला.
रखरखते ऊन व वाळलेले पाचरट यामुळे क्षणात आगीचा डोंब उसळला व आगीने क्षणात रौद्र रुप धारण केले. ट्रॕक्टर चालकाने प्रसंगावधान राखुन आग लागलेली ट्रॅाली तेथेच सोडुन ट्रॕक्टर व एक ट्राॅली घेवुन उसाच्या थळाच्या बाहेर आला. याच ठिकाणी ऊसतोडणी मजुरांच्या बैलगाड्या सोडलेल्या होत्या. आगीवर नियंञण मिळवता मिळवता तीन रिकाम्या बैलगाड्याही जळुन खाक झाल्या. येथील ऊसतोडणी पुर्ण झाल्याने ऊसतोडणी करणाऱ्या महीला कामगार पुढच्या थळाकडे मार्गस्थ झालेल्या होत्या. लहान मुलेही त्यांच्या सोबत गेलेली असल्याने मोठी दुर्घटना टळली अन्यतः ती मुल बैलगाडीच्या सावलीतच बसलेली होती असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.या दुर्दैवी घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नाही.
ऊसतोडीवाल्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या बैलगाड्या जळाल्याने उसतोडीवाल्यांवर चांगलेच संकट ओढावले आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये नुकसान झालेल्यांना भरपाई मिळते का याकडे लक्ष लागले आहे.