शिवप्रहार न्यूज- श्रीसंत सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने राष्ट्रासाठी होणार १ कोटी २५ लाख तासांचे 'महाश्रमदान'
श्रीसंत सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने राष्ट्रासाठी होणार १ कोटी २५ लाख तासांचे 'महाश्रमदान' !
संपादक / मयुर फिंपाळे
जय बाबाजी भक्त परिवाराची 'श्रमेव जयते' ब्रीद घेऊन देशव्यापी मोहीम
निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांनी कृषी व ऋषी सेवा हे तत्व घेऊन सन १९६४ साली समाजकार्यासाठी 'श्रमदान' परंपरा सुरु केली. गेल्या पाच दशकांपासून ही परंपरा अखंडितपणे त्यांच्या पश्चातही परमपूज्य बाबाजींचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आजही मोठ्या उत्साहात सुरू आहे . 'श्रमेव जयते' या तत्वानुसार श्रमप्रतिष्ठा वाढविण्यासाठी राष्ट्रासाठी सव्वा कोटी तास श्रमदान करण्याचा संकल्प स्वामीजींच्या प्रेरणेने जय बाबाजी भक्त परिवाराच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे.
राष्ट्राच्या सेवेसाठी एक व्यापक मोहीम असुन समाजातील सर्व घटकांना यामध्ये सहभागी करण्याचा उद्देश यानिमित्ताने ठेवण्यात आला आहे. 'श्रमेव जयते' या तत्वानुसार समाजातील सर्व घटकांकडून श्रमदान करून घेत श्रमप्रतिष्ठा वाढविणे, श्रमदानाच्या माध्यमातुन अनेक गावांमध्ये लोकोपयोगी कामे करणे, ज्यामध्ये कृषी जनजागृती,वृक्षारोपण, जलसंधारण,रस्ते दुरुस्ती,ग्रामस्वच्छता आदी महत्वपूर्ण कामे केली जाणार आहेत.
श्रमदानाच्या माध्यमातुन समाजाला निरोगी जीवनमान प्रदान करण्याचा मानस असल्याचे जय बाबाजी भक्त परिवाराकडून सांगण्यात आले आहे. या अनुषंगाने देशभर ही मोहीम नेऊन श्रमप्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रमासह व्यापक जनजागृती केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून आयोजन करण्यात येत आहे.
७ ते १४ फेब्रुवारी २०२२ हा पहिला सप्ताह असुन पहिल्या सप्ताहात आश्रम परिसर स्वच्छतासंबधी कामकाज पार पडणार आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत सव्वा कोटी तास श्रमदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेत देशभरातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येत आहे. समाजातील इच्छुक व्यक्तींना सहभागी करून घेण्यासाठी 'महाश्रमदान' हे मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात आल्याची माहिती संस्थेचे आश्रमिय संत रामानंदजी महाराज यांनी दिली.
प्रतिक्रिया:
निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांनी सांगितलेले "जो करील श्रमदान,त्यासी घडेल चारीधाम" हा दिव्य विचार समाजात पेरून सशक्त समाज निर्मितीसाठी महाश्रमदान मोहीम जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांना यात सहभागी करून मोहीम राबविली जाणार आहे.
- श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर श्रीसंत सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज
असे आहे महाश्रमदान सोहळ्याचे स्वरूप...
-सर्वप्रथम श्रमदान करणाऱ्या व्यक्तीची नोंदणी ही श्रमदान सेवकामार्फत केली जाईल.
-श्रमदान सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किमान ३३ तास श्रमदान नियोजित ठिकाणी करायचे आहे.
-श्रमदान करणाऱ्या व्यक्तीला श्रमदान कार्ड देण्यात येईल.त्यावर श्रमदानाची तारीख, ठिकाण,वेळ नोंद केली जाईल.
-दर महिन्यातून रविवार ते रविवार एक श्रमदान असे सप्ताह राहतील.