शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर तालुक्यात दारूड्या मित्रमंडळीमुळे हळदीच्या दिवशीच विवाह मोडला…
श्रीरामपूर तालुक्यात दारूड्या मित्रमंडळीमुळे हळदीच्या दिवशीच विवाह मोडला…
टाकळीभान- प्रतिनिधी- : लग्नाला मुलीची पसंती होवून अखेर ठरल्याप्रमाणे वरा सह वर्हाड हौशेने दाखल झाले. हळदी समारंभ पुर्वसंध्येला हळदीच्या दिवशी वरपक्षाकडील नवरदेवाच्या मित्रमंडळींनी मदीरा प्राशन करून हळदी समारंभात गदारोळ केला. त्यांनी केलेल्या या “रंगीत” पार्टीचे परिणाम प्रत्यक्षात लग्न मोडण्यात झाले. वधूपक्षाकडून अशा व्यसनी असलेल्या लोकांना मुलगी न देण्याचा धाडसी निर्णय यावेळी घेतल्याने बोहल्यावर चढण्याआधीच घरचा रस्ता वराला धरावा लागल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे नूकतीच घडली.
याबाबतची माहीती अशी की, टाकळीभान येथील एका मुलीचा विवाह अहिल्यानगर येथील मुलाशी ठरला होता. रीतीभाती प्रमाणे लग्न समारंभाचे सर्व काही ठरले. मुला- मुलीचा लग्नाचा शुभमूर्हतही ठरला. वरपक्षाचे जवळील नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या आनंदात हळदीसाठी टाकळीभान येथे येवून दुसर्या दिवशी नवरदेव बोहल्यावर उभा राहणारच होता. मात्र त्या अगोदरच वरपक्षातील नातेवाईक व मित्रमंडळीने आपले गुण दाखवले. लग्नाच्या पुर्व संध्येलाच हळदीच्या दिवशी कुठलाही मुलाहीजा न बाळगता नवरदेवाच्या मित्रांनी यथेच्छ अशी दारू प्राशान केली. दारूच्या नशेत हळदीच्या ठिकाणीच वरपक्षाकडील वराच्या मित्रांकडून धिंगाणा सुरू झाला. हा सर्व तमाशा हताश होवून वधूपक्षाकडील लोक पाहत होते. काय करावे समजत नव्हते. अशा व्यसनाधीन मित्रपरिवार असलेल्या मुलाला मुलगी कशी द्यावी. असा यक्ष प्रश्न वधूपक्षाकडील लोकांसमोर उभा राहीला. अखेर मुलगी न दिलेलीच बरी असा धाडसी निर्णय यावेळी वधूपक्षाकडील मंडळीनी घेवून वराला बोहल्यावर चढण्याअगोदरच घरचा रस्ता दाखवला.
आजमितीला समाजात व्यसनाधिनता वाढत चालली असून तरूण वर्ग या व्यसनाचे शिकार होत आहे. कुठे काय करावे याची जराशीही पर्वा न करता वाहवत चाललेला तरूण या व्यसनाधिनतेने बरबाद होत आहे. अशा या व्यसनी मित्रपरिवार असलेल्या वराची बिगरव्यसनीपणाची खात्री कोण देईल ? संसाराची वेल फुलण्याआधीच ती कोमेजून जात असेल तर ते न झालेलेच बरे ! व येथेही तसेच झाले. अखेर वधूपक्षाकडील लोकांनी हुशारीने हा विवाह सोहळा हळदीच्या दिवशीच मोडला. या निर्णयाने वधूपक्षाकडील लोकांचे कौतूक होत आहे.