शिवप्रहार न्युज - नेवाशात बसमध्ये दागिने चोरणार्या श्रीरामपूरच्या 02 महिला जेरबंद...

नेवाशात बसमध्ये दागिने चोरणार्या श्रीरामपूरच्या 02 महिला जेरबंद...
नेवासा/श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- एसटी बसने प्रवास करणार्या व बसमध्ये चढताना मुद्दाम धक्काबुक्की करून महिलांचे दागिने चोरणार्या महिला चोरांना नेवासा पोलिसांनी जेरबंद केले आहे. बुधवार 8 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मीरा मच्छिंद्र डेंगळे (वय 65) रा. लोणी ता. राहता या लोणीकडे जाण्यासाठी भगवानगड ते नाशिक या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील 42 हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरले. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजय साठे, पोलीस नाईक अरुण गांगुर्डे, किरण पवार यांनी हाती घेतला होता. अनोळखी संशयित महिला चोरांबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपासा दरम्यान तातडीने नेवासा बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता नागरिकांनी माहिती दिल्याप्रमाणे संशयित महिला दिसून आल्या होत्या. संशयित महिलांची ओळख पटवण्यासाठी नेवासा पोलिसांनी मागील सात दिवस नेवासा ते श्रीरामपूर बस स्थानकापर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली.तसेच आरोपी महिला रहात असलेल्या ठिकाणापर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणीकरून नावे निष्पन्न केली. नेवासा पोलीस सदर संशयित महिलांच्या घरापर्यंत पोहोचताच व पोलिसांना पाहताच त्या कावर्याबावर्या झाल्या. त्यांना नेवासा बस स्थानकातील चोरीबाबत विचारपूस केली असता सुरुवातीला नकार दिला परंतु पोलीसी खाक्या दाखवण्याची भिती घालताच कबुली दिली. तसेच फिर्यादी महिलेचे चोरलेले सोन्याचे दागिने काढून दिले.कांताबाई कमल लोंढे व सरस्वती दत्तू खंडारे,दोन्ही रा. अशोकनगर, ता.श्रीरामपूर या महिलांना ताब्यात घेऊन अटकेची कार्यवाही केली. यापूर्वी देखील नेवासा बसस्थानक येथून चोरीच्या घटना घडल्या आहेत.या घटनेमध्ये या अटकेतील आरोपी महिलांचा काही संबंध वगैरे आहे का ? याचा देखील तपास केला जाणार आहे.