शिवप्रहार न्यूज- अकोले तालुक्यातील बालकांसाठी 'पोषण अभियान' ठरतेयं वरदान; कुपोषित बालकांची संख्या घटली…
अकोले तालुक्यातील बालकांसाठी 'पोषण अभियान' ठरतेयं वरदान; कुपोषित बालकांची संख्या घटली…
*शिर्डी, दि.०५ (उमाका वृत्तसेवा) –* महाराष्ट्र शासनाचं 'पोषण अभियान' अकोले तालुक्यातील बालकांसाठी वरदान ठरतं आहे. या अभियानाच्या माध्यमातून येथील कुपोषित बालकांच्या प्रमाणात मागील वर्षाच्या तुलनेने कमालीची घट झाली आहे. या अभियानाच्या माध्यमातून ह्दयाला छिद्र असलेल्या बालकांची शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे आणि दूर्धर आजारापासून बालकांची सुटका झाली आहे.
अकोले तालुका अहमदनगर जिल्ह्यातील दुर्गम असा तालुका आहे. या तालुक्यात बहुसंख्य वस्ती आदिवासी समाजाची आहे. कुपोषणाच्या बाबतीत एकेकाळी अकोला तालुक्याचा मेळघाट, पालघर खालोखाल नंबर होता. आज मात्र या तालुक्यातील कुपोषित बालकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांनी या तालुक्यांमध्ये सातत्यपूर्ण राबविलेल्या पोषण अभियानामुळे हे शक्य झाले आहे.
अकोले तालुक्यात अकोले व राजुर असे दोन एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून कुपोषित बालकांचे सातत्याने सर्वेक्षण केले जाते. यासाठी तालुका आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. वाड्या-वस्त्यांमध्ये सर्वेक्षण करून कमी वजन व कमी उंची असलेले बालकांचा शोध घेतला जातो. कमी वजनाच्या बालकांना नाचणीपासून बनविलेला आहार, पदार्थ तसेच गुळ-शेंगदाणे लाडू, अमृत आहारामध्ये अंडी व केळी देऊन मुलांच्या वजनांमध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. पोषण अभियानाद्वारे पालक सभा, पोषण रॅली, माता बैठका घेण्यात येतात. पोषण माह, पंधरवडा अभियान राबविण्यात येते. दूरध्वनीच्या माध्यमातून कुपोषित बालकांच्या माता व पालकांशी वेळोवेळी संवाद साधला जातो.
*बालकांची दूर्धर आजारापासून सुटका :-*
तालुका आरोग्य केंद्राच्या माध्यमातून बालकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. यामाध्यमातून दूर्धर आजार असलेल्या बालकांचा शोध घेतला जातो. यात पिंट्या रामदास तातळे (कातळापूर), संध्या हिरामण भांगरे (डोंगरवाडी) व सान्हवी शंकर हिले (गोंदुशी) या बालकांच्या ह्दयाला छिद्रे असल्याचे तपासणीत आढळून आले त्यांच्यावर एसएमबीटी रूग्णालयात शस्त्रक्रीया करण्यात आली. आज ही बालके सुस्थित आहेत. यामुळे बालक व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. अंगणवाडींच्या माध्यमातून नियमित सकस आहार व आरोग्य विभागाकडून नियमित आरोग्य तपासणी व औषधांमुळे राजूर प्रकल्पातील ६ दूर्धर आजारी बालकांचे आरोग्य सामान्य बालकांप्रमाणे झाले आहे.
"शासनाचे 'पोषण अभियान' वाड्या-वस्त्यांवर पोहविण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच आरोग्य विभागाने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केलेल्या नियमित आरोग्य तपासणी, शिबीरांमुळे आज अकोले व राजूर प्रकल्पातील कुपोषणाचं प्रमाण घटले आहे. येत्या काळात पोषण अभियानाची मोहीम सातत्यपूर्ण सुरू राहणार आहे. यासाठी बालकांच्या आरोग्याप्रती पालकांनीही सजग राहून प्रशासनास सहकार्य करावे." असे मत अकोले एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब हाके व राजूर प्रकल्प अधिकारी भारती साताळकर यांनी व्यक्त केली आहे.