शिवप्रहार न्यूज- आधुनिक स्वामी विवेकानंद “श्री स्वामी गोविंददेवगिरी”महाराजांचा इंडोनेशियात वाजला डंका…

शिवप्रहार न्यूज-  आधुनिक स्वामी विवेकानंद “श्री स्वामी गोविंददेवगिरी”महाराजांचा इंडोनेशियात वाजला डंका…

आधुनिक स्वामी विवेकानंद “श्री स्वामी गोविंददेवगिरी”महाराजांचा इंडोनेशियात वाजला डंका…

श्रीरामपूर- स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत सनातन हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करून आपले तत्वज्ञान जगापुढे मांडले होते. त्यांच्यानंतर तब्बल १२९ वर्षांनी बेलापूरचे भूमिपुत्र, राष्ट्रसंत, अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांच्या रूपाने भारताला दुसऱ्यांदा जागतिक धर्म परिषदेत आणि प्रथमच जागतिक मुस्लिम धर्म परिषदेत प्रतिनिधीत्व करण्याचा जागतिक बहुमान मिळाला.

      या परिषदेत त्यांना श्रीराम मंदिर निर्माण समितीचे कोषाध्यक्ष या पदनामाचा विशेष उल्लेख करून भाषणासाठी मंचावर बोलाविण्यात आले. आपल्या १४ मिनिटांच्या भाषणांची सुरुवात त्यांनी सर्वांना नमस्काराने केली तर ओम शांती शब्दांनी समारोप केला. यावेळी त्यांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडले. त्यामुळे सभागृह टाळ्यांनी दुमदुमून गेले होते.

      वैज्ञानिक विकासातून भौतिक चंगळवाद वाढल्याने पृथ्वी, पाणी, हवा या प्रदूषित झाल्या झाल्या असून पृथ्वीचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान जगापुढे आहे. आपण सर्वजण डोळे, नाक, कान बंद करून बसलो असून एकमेकांच्या धर्मांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जगातील अंधकार घालवण्याची शक्ती सर्व धर्मांच्या तत्वज्ञानात आहे. मात्र धर्माच्या प्रेषितांनी दिलेला एकात्मवादाचा संदेश पाळला जात नाही. त्यामुळे जागतिक अशांतता निर्माण होत आहे. त्यासाठी प्रत्येकाने धर्मांचे चिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरी यांनी इंडोनेशिया येथील बाली येथे आयोजित जागतिक मुस्लिम धर्म परिषदेत बोलताना केले.

    जागतिक शांतता राखण्यासाठी प्रत्येक धर्माच्या तत्वज्ञानाची गरज लक्षात घेता त्या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष कसा उपयोग करता येईल याचे तात्विक चिंतन - मंथन करण्यासाठी इंडोनेशियातील बाली शहरात तीन दिवसीय जागतिक मुस्लिम धर्म परिषदेचे आयोजन केले असून त्यात भारताचे हिंदू धर्म प्रतिनिधी म्हणून स्वामी गोविंददेव गिरी यांना या परिषदेने विशेष निमंत्रित केले आहे. त्यात आयोजित उद्घाटनप्रसंगी आपले विचार मांडताना ते बोलत होते.  

    जगात सर्वत्र एकच भगवंत असल्याने आपण नैसर्गिकरित्या बंधू-भगिनी आहोत. परमेश्वराने जगातील प्रत्येक देशातील प्रत्येक धर्मात धर्माचरणासाठी प्रेषित पाठविले आहेत. परंतु | त्यांच्यामार्फत दिला जाणारा एकात्मवादाचा संदेश पाळला जात नाही. त्यातून जागतिक अशांतता निर्माण होत आहे. भौतिक चंगळवाद फोफावल्याने धर्मांचे तत्वज्ञान व मौलिक विचार लुप्त झाले आहेत. भौगोलिक बदल तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिक समस्या आणि धर्माच्या नावाखाली निर्माण होणारी आव्हाने दूर करण्यासाठी आता धार्मिक चिंतन मंथन करून नैतिकतेची तत्वे शिकविण्याची आणि विविध धर्मांच्या विचारसरणीत संतुलन राखण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत स्वामी गोविंददेवगिरी यांनी व्यक्त केले.