शिवप्रहार न्यूज - लाल - काळ्या मातीतील नामांकित मल्ल ते शिस्तप्रिय क्रिडा शिक्षकाच्या आनंदयात्रेचा प्रेरणादायी प्रवास...!
लाल - काळ्या मातीतील नामांकित मल्ल ते शिस्तप्रिय क्रिडा शिक्षकाच्या आनंदयात्रेचा प्रेरणादायी प्रवास...!
अहमदनगर -शहरातील १९६८- १९७६ चा काळ होता... अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर तसेच रामचंद्र खुंट नजीकच्या दाणे डबरा तालमीत पै. आनंदा उर्फ पै. आण्णा नावाच्या एका तरुणाची आगळीवेगळी ओळख निर्माण झाली होती. नेवासा तालुक्यातील मु.पो. चांदा येथील हिंदवी स्वराज्याचे पहिले सरनोबत माणकोजीराजे दहातोंडे या ऐतिहासिक कुटुंबाचा वंशज व एका शेतकरी कुटुंबातील वय वर्ष १७-१८ वयोगटातील तडपदार तरुण महाविद्यालयीन शिक्षणासाठी अहमदनगर येथे पोहचला होता. कौटुंबिक नातेसंबंधातील स्थानिक पालक म्हणून स्वातंत्र्यसैनिक कै. श्री शंकरराव अहिलाजी म्हस्के उर्फ "नाना वस्ताद" यांच्या कडे कुटुंबाने जबाबदारी सोपवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहरातील रामचंद्र खुंट जवळील दाणे डबरा तालमीत यापूर्वी वर्षानुवर्षे रेवडी वर सुरू असलेली कुस्ती ही लाल - काळ्या मातीसह गादीवर तग धरू लागली होती.
कुस्ती बरोबर अँथलेटिक्स अर्थात मैदानी खेळात उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक, धावणे, पोहणे, रिले, मॅरेथॉन, मल्लखांब, कब्बडी, खो-खो यासह इतर भारतीय खेळ तसेच धाडसी क्रिडा प्रकारात सरस होत या युवकाने अहमदनगर महाविद्यालय, पुणे विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विविध खेळ प्रकारात विशेष नैपुण्य मिळवलं आणि जिल्ह्याच्या क्रिडाविश्वासह स्वतःची आगळी वेगळी ओळख क्रिडा व शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केली. कुस्तीतील कामगिरी मुळे त्यांना प्रचंड मोठा मानपान तसेच धावण्याच्या क्रिडा प्रकारात त्यांच्या विशेष कौशल्य व क्षमतेमुळे 'बुलेट' नावाने राज्यभरात प्रसिद्धी मिळविली.
शैक्षणिक आणि क्रिडा प्रकारात स्वतःचं अस्तित्व कोरणारा हा तरुण सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक व सेवाभावी जीवनात देखील खुपसा समरस होता. तरुण वर्ग व अबालवृद्धांना या तरुणाने स्वतःच्या कष्टाळू, स्वावलंबी, मनमिळावू, शिस्तप्रिय, क्रिडा कौशल्य, सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक पूरक वर्तनाने तसेच स्वयंमस्फुर्तीने मदतकार्य करणाऱ्या स्वभावाने ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्य विद्यार्थांना मदत करण्याच्या दातृत्व वृत्तीने हा तरुण नकळत सर्वांचा आधारवड तर ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थी वर्गाचा आधार बनला.
जीवन तत्वज्ञान, समाजभिमुक, सर्वधर्म समभाव व सहकार्य वर्तनातून पै. आनंद उर्फ पै. आण्णा नावाचा हा तरुण मुस्लिम समाजात अन्वर, जैन समाजात आनंद, हिंदू समाजात आनंदराव, शिख समाजात आण्णासिंग तर ख्रिश्चन समाजात अनु नावाने जनमानसांत ओळखला जावू लागला. १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार समाजात स्वतःची एक गुरुबहीण व मानसबंधू प्रकारात नाते बनवून ते सर्वस्वी जबाबदारीसह अबाधित ठेवले. नगरच्या सैन्याच्या छावणीत देखील या खेळाडूच्या विशेष चर्चा असायच्या आणि नगरकरांच्या विश्वासात उतरून नगरचा डाग बंगला देखील यासाठी एकेकाळी सर्वसेवा सुविधासह खुला असायचा. नगरचे वैभव असलेले श्री. बन्सी महाराज जोशी उर्फ बन्सी महाराज मिठाईवाले परिवार पै. आण्णा यांच्या आहाराची संपूर्ण जबाबदारी घेवून त्यांच्या पाठीशी उभा होता. पै. आण्णा म्हणजे विश्वासाचे व आधाराचे त्या दशकात नगर शहरात दुसरे नाव बनले होते. सकाळ - तालीम, दुपारी महाविद्यालय, संध्याकाळी मैदान व तालीम आणि उर्वरित वेळेत नगर मधील धनाढ्य, जमीनदार व सावकार कुटुंबियांच्या मुलांना पै. आनंदा उर्फ पै. आण्णा आणि त्यांचे वडील बंधू पै. आप्पा हे कुस्त्या शिकवायचे. महाविद्यालयीन जीवनात मुलं-मुली, शिक्षक आणि विविध वयोगटातील नगरकर देखील एक वेगळ्या आदराने या तरुणाला आपलं म्हणून आदर देत असत.
वर्ष १९६९-७० मध्ये ऑलम्पिक विजेते कुस्तीपटू तसेच भारतीय कुस्ती प्रशिक्षण संस्थेचे मार्गदर्शक पै. श्री. श्रीरंग जाधव यांनी अहमदनगर महाविद्यालयाला भेट दिली. प्रसंगी त्यांच्या उपस्थितीत कुस्तीचे प्रशिक्षण सुरू असतांना डाव प्रतिडावात पै. आनंदा उर्फ पै. आण्णा यांच्या डोक्याला जबरी इजा झाली. प्रसंगी अहमदनगर महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य श्री. टी. बार्नबस यांनी त्वरित बूथ हॉस्पिटल (दगडी दवाखाना), नगर येथे त्यांना उपचारासाठी दाखल केले. त्यावेळेस नुकतेच लंडन येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून परतलेले मेंदूविकार व शल्यचिकित्सक तज्ञ डॉ. श्री. देवधर व डॉ. श्री. केतकर यांनी त्यावर उपचार सुरू केले. दरम्यान उपचाराचा खर्च महाविद्यालयाने करण्याची जबाबदारी नाकारली हे कळताच सर्व विद्यार्थी - विद्यार्थीनीनी अहमदनगर महाविद्यालयाचा विरोधात बंद पुकारून जो पर्यंत पै. आनंदा उर्फ पै. आण्णा यांच्यावर होणाऱ्या वैद्यकीय उपचाराची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालय घेत नाही, तो पर्यंत महाविद्यालयात बंद सुरू ठेवला. अखेर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने पै. आनंदा उर्फ पै. आण्णा यांच्या वैद्यकीय उपचाराची संपूर्ण जबाबदारी घेतली व दिड-दोन महिन्याच्या उपचारानंतर पै. आनंदा उर्फ पै. आण्णा हे सदर अपघातातून सुखरूप बचावले व पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात नवा जोम आणि उमदीने उतरले.
अहमदनगर शहरातील नामांकित महाविद्यालयातून बी.ए. व एम.ए. पदवीचे शिक्षण पूर्ण करून या युवकाने औरंगाबाद येथून सर्वप्रथम बी.पी.एड व एम.पी.एड. पदवी पूर्ण करत अहमदनगर जिल्हयातील पहिली एम.पी.एड. ही पदवी संपादन केली. तदनंतर सातत्यपूर्वक क्रिडा विषय आणि क्रिडा कौशल्य क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व अबाधित ठेवत मा. खा. चंद्रभान आठरे पाटील व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी श्री सेवेकर साहेब, कै. श्री. रामभाऊ अकोलकर, कै. बाळाजी आठरे यांच्या वैयक्तिक मार्गदर्शनानुसार प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत प्रथम आश्वि, राजुरी व दाढ येथे क्रिडा शिक्षक व तदनंतर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, लोणी - प्रवरानगर येथे क्रिडा संचालक पदावर तब्बल ३२ वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा देत राज्य व राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट खेळाडू, विद्यार्थी तसेच समाजभिमुक नागरिक घडविले.
महाविद्यालयीन जीवन ते अध्यापन कार्य हे सर्व सुरू असतांना त्यांनी त्यांच्यातील पैलवान कधी ही गप्प बसू दिला नाही. रेवडी पासून सुरू केलेली त्यांची कुस्ती, अहमदनगरच्या रामचंद्र खुंट जवळील दाणे डबरा तालीम ते मोतीबाग तालीम कोल्हापूर तर कधी बेळगावच्या लाल मातीत सहज फिरून आली, महाविद्यालयाचे मैदान, आंतर ते विद्यापीठ स्पर्धा आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावर जाऊन सदैव विजयी भव: प्रकारात खेळत राहिली.
वडील हरिभाऊ, चुलते भानुदास, कुशीनाथ, पंढरीनाथ आणि स्वातंत्र्यसैनिक - नाना वस्ताद यांच्या सह सन १९५२ च्या ऑलम्पिक स्पर्धेतील विजेते कुस्तीगीर कै. पै. श्री. खाशाबा जाधव यांचे देखील त्यांना वेळोवेळी व्यक्तिशः मार्गदर्शन व प्रेरणा मिळायची. तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, मा. केंद्रीय मंत्री पदमविभूषण खा. बाळासाहेब विखे पा., मा. मंत्री श्री. आण्णासाहेब म्हस्के, मंत्री. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, डॉ. श्री अशोक पाटील विखे, ऍड. श्री. राजेंद्र पाटील विखे आदींचे आवश्यतोपरी प्रेरणा मिळाली. तर प्राचार्य श्री. विलास आठरे, प्राचार्य डॉ. मोहनराव हापसे, प्राचार्य डॉ. ठुबे सर, प्राचार्य डॉ. प्रकाश गुंजाळ, प्राचार्य डॉ. लांडगे, प्राचार्य डॉ. एस टी निकम, प्राचार्य डॉ. श्री. एस आर वाळुंज व प्राचार्य एन. डी. बोधई आदींचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.
कुस्तीच्या आखाड्यात कधी ही पाठ जमिनीला न टेकवता या पहिलवानाने प्रत्येक जोडीचा आणि जोडीपेक्षा देखील सरस असलेला प्रत्येक मल्ल हा कुस्तीच्या नितीमुल्य व डावपेच जमवत स्वतःचे कौशल्य तसेच क्रिडा स्वप्नांच्या शर्तीने सदैव स्पर्धा जिंकली तर कधी पंचांच्या सूचनेनुसार तह करत कुस्ती बरोबरीने सोडवावी लागली. हिंद केसरी श्री हरिश्चंद्र बिराजदार, महाराष्ट्र केसरी श्री गुलाबराव बर्डे, पंजाब केसरी सिंग असे अनेक नावे आहेत. ठरवलं असतं तर पंचांच्या प्रत्यक्ष विनंतीला डावलून कुस्ती लढून जिंखता आली असती, मात्र प्रतिस्पर्धकांचा कुस्ती क्षेत्रातील सर्वोत्तम बहुमान, राज्य व देशपातळीवर त्यांचं कुस्तीक्षेत्रातील योगदान विचारात घेता पंचांच्या मध्यस्थ भूमिकेतून कुस्ती बरोबरीने सोडून काही प्रसंगी तडजोड देखील केली. प्रत्यक्ष प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णांच्या कुस्तीचा आणि पैलवान वृत्तीचा अनुभव घेतलेले जाणकार सांगतात प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा पहिलवान एकदा कुस्तीच्या आखाड्यात उतरला की दंड थोपवत अगदी डोळ्यांची पापणी लावण्याच्या आत त्यांची कुस्ती संपायची आणि हार तुरे परिधान केलेला विजेता पै. आण्णा उर्फ प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) हा कुस्तीगीर प्रेक्षक व चाहत्यांच्या खांद्यावर विराजमान झालेला असायचा. एकेकाळी प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा यांच्या कुस्त्या या थेटरला चालायच्या तर राज्यभरातील यात्रा, जत्रा दरम्यानचा दरवर्षी भरणारा हगामा तसेच थेटर कुस्त्या आणि त्यात प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा येणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांना जणू वर्णीच असायची. काही लोक सांगतात प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा कुस्तीच्या आखड्याला किंवा हगाम्यांला येणार म्हंटल की आम्ही मिळेल ते साधन करून कुस्ती पाहायला त्या त्या गावी आणि ठिकाणी पोहचायचो.
वर्ष १९७२-७३ साली अहमदनगर जिल्ह्यातील पाथरे येथे रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यासोबतची कुस्ती आणि वर्ष १९८६-८७ मध्ये घोडेगाव येथे महाराष्ट्र केसरी पै. श्री गुलाब बर्डे यांच्या सोबत झालेल्या तडजोडीचा कुस्तीने अहमदनगर जिल्ह्याला नकळत रुस्तुम ए हिंद आणि महाराष्ट्र केसरी पदाच्या जोडीचा सन्मान मिळून दिला होता. वर्ष १९८४-८५ साली कोल्हार येथे पंजाब केसरीशी त्यांची झालेली कुस्ती म्हणजे महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी बाब होती.
प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा यांची कुस्ती पहायला आणि पंच म्हणून अनेक मातबदार / मान्यवर मल्ल आणि वस्ताद हे स्वतःहून हजेरी लावायचे. सहकार महर्षी कै. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कै. मा. आ. श्री. चंद्रभान घोगरे पाटील, कै. श्री. जयंतराव आहेर, कै. मा. आ. कॉम्रेड श्री. पी. बी. कडू पाटील, कै. कॉम्रेड आ. श्री. माधवराव गायकवाड, कै. कॉम्रेड श्री. रामदास बाद्रे, कै. कॉम्रेड श्री. एल. पी. दातीर, कै. पै. साधू गुंजाळ, कै. पै. शंकर घुले, कै. छबु पैलवान, गुरुवर्य कै. प्रा. मंगलसिंग ठाकूर (सर), गुरुवर्य प्रा. ताकपेरे (सर), गुरुवर्य प्रा. श्री. रंगनाथ डागवाले (सर), पै. श्री. त्रिपनकर (आप्पा), कोल्हापूर, पै. श्री. चिंटू (आण्णा) गाडीकोप, बेळगाव, पै. श्री जयंत पवार, पै. प्रा. श्री. अंबर सांगळे, पै. श्री आप्पा गवळी, नगर, पै. श्री. बाबाकिसन टाकपेरे, नगर, पै. श्री पोपटराव पवार, पै. श्री रामनाथ आहेर, पिंपळगाव, कै. बन्सी महाराज जोशी (बन्सी महाराज मिठाईवाले, नगर), कै. आबाजी आठरे, कै. रा. मु. शिंदे (सर) कै. पै. श्री. बाबुकाका घोलप, कै. श्री. शंकरराव निबे, कै. शंकर (नाना) खर्डे, कै. श्री. रामराव सोनवणे, कै. कॅप्टन श्री. विजय गुणे, श्री शंकरराव भुसाळ, आश्वि, कै. भारत (दादा) तांबे, श्री कोंडाजी जाधव, कै. श्री. भाऊसाहेब पाटील आहेर, कै. श्री. शंकरराव जोशी, कै. श्री. शंकरराव कोरडे, कै. प्रा. श्री. शंकरराव दिघे, कै. श्री. गोपीनाथ तांबे, कै. सर्जेराव तांबे, कै. श्री. सूर्यभान तांबे, कै. श्री. म्हातारदेव सोनवणे, कै. श्री. रामकिसन चौधरी, कै. श्री रंगनाथ चौधरी, कै. श्री भानुदास चौधरी, कै. श्री. सर्जेराव जाधव (पाटील), कै. श्री. निवृत्ती मोटे, कै. श्री. रामनाथ पाटील वाबळे, कै. झणझने साहेब (आप्पा), कै. नानासाहेब थोरात, प्रा. कै. श्री. राजेंद्रसिंग जैस्वाल, कै. श्री. लक्ष्मण दहातोंडे (गुरुजी), कै. श्री. दिगंबर दहातोंडे, कॉम्रेड श्री. आण्णासाहेब थोरात, वडील बंधू पै. श्री. आप्पासाहेब दहातोंडे, श्री. सदाशिव चौधरी आदी तर प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा यांच्या स्वतः कुस्तीची जोड लावून मान्यवरांची कुस्ती म्हणून खेळवायचे.
मेजर श्री. डी के झरेकर, श्री. बाळासाहेब मांढरे, श्री. दत्तात्रय पाटील तांबे, श्री. प्रताप तांबे, श्री वसंतराव मोरे, श्री. ज्ञानदेव कातोरे, श्री. चांगदेव जाधव, प्रा. श्री रावसाहेब धस, श्री पंडितराव धस, श्रीमती अलकनंदा जोगळेकर (पांडे), श्री. हरिभाऊ पन्हाळे, श्री अरुण दहातोंडे, श्री. रमेश दहातोंडे, श्री कारभारी जावळे, श्री. मोहनराव भगत, श्री. बाळासाहेब दहातोंडे, श्री. शिवाजी दहातोंडे, श्री. आबा भाकड, श्री. आंबडे गुरुजी, श्री. संभाजीराजे दहातोंडे, श्री गणपत जावळे, श्री. लक्ष्मण दहातोंडे (गुरुजी), श्री. दिलीप मधीकर, श्री प्रकाश थोरात, श्री कचरू थोरात, श्री. शिवाजी आहेर, श्री. नथुराम आहेर (सर), श्री. अशोक धावणे, प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर, प्रा. डॉ. डी जी थोरात, प्रा. डॉ. दिपक माने, प्रा. श्री. लक्ष्मण विखे, प्रा. श्री. बाळासाहेब विखे, प्रा. श्री. पी. के. शेळके, प्रा. श्री. विजय आहेर, प्रा. शिवाजी रेठरेकर, प्रा. श्री. भाऊसाहेब तळोले, श्री. एस. बी. शेटे, श्री. अशोक चौधरी, श्री. प्रदीप चौधरी, श्री विजय चौधरी, प्रा. श्री. आप्पासाहेब कडसकर, श्री. संभाजी हापसे, श्री. आप्पासाहेब सालपुरे, श्री. संजय धावणे, श्री. ताराचंद तनपुरे, श्री. ज्ञानदेव दहातोंडे, श्री. भास्कर लगड, श्री. संदिप गायकवाड, श्री. रामकृष्ण जपे, डॉ. दिपक शिंदे, न्यायाधीश श्री. सुनिल दहातोंडे, उपजिल्हाधिकारी श्री. संतोष थिटे, प्रा. श्री. अरुण चौधरी आदींनी सांगितलेले अनेक किस्से हे सदैव आठवणीत आणि चर्चेत आहेत.
वर्ष १९८३-८४ साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या प्रवरा उद्योग, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक समूहाला भेट देण्यास आल्या होत्या, त्यांच्या स्वागतासाठी संस्थेच्या व्यवस्थापनाच्या सूचनेप्रमाणे प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा यांनी लेझीम पथक बनवून स्वर्गीय इंदिराजींचे मोठ्या दिमाखात प्रवरा परिवारात स्वागत केले. महाराष्ट्रीय क्रिडा प्रकारातील या लेझीम पथकाच्या अविष्काराने स्वर्गीय इंदिराजी भारवल्या, प्रसंगी स्वर्गीय पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व स्वर्गीय पदविभूषण खा. श्री. बाळासाहेब विखे पाटील यांना सुचविले की सदरचे लेझीम पथक हे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व म्हणून राजपथावर पाठवता येईल का? प्रवरेने हे निमंत्रण त्वरित स्वीकारले मात्र दरम्यान इंदिरा गांधी यांची ऑक्टोबर, १९८४ साली निर्घृण हत्त्या झाली आणि प्रवरेचे हे लेझीम पथकाचे निमंत्रण हे फक्त सर्वांच्या आठवणीत राहून गेले.
शैक्षणिक सेवेतील प्रदीर्घ कार्यात प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा हे त्यांच्या विद्यार्थी वर्गात अतिशय शिस्तप्रिय शिक्षक व त्यांच्या सहकार्य वर्तनामुळे प्रसिद्ध आहेत. विविध प्रकारातील क्रीडा स्पर्धा आयोजनात महाविद्यालयीन स्तर, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेवून योगदान देण्याचा स्वभाव व त्यातील बारकावे टिपक स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध, तंतोतंत, प्रभावी व यशस्वीपणे पूर्ण करण्यात प्रा. ए. एच. दहातोंडे उर्फ पै. आण्णा यांचे कार्य सदैव अविस्मरणीय आहे. महाविद्यालयाच्या परिसरात व्यतिरिक्त विद्यार्थी वर्गाच्या क्रिडा स्पर्धा व स्पर्धेच्या प्रवासात त्यांची अर्धांगिनी सौ. सुनंदा दहातोंडे यांनी देखील विशेष योगदान देत स्पर्धेला जाणाऱ्या संपूर्ण स्पर्धकांच्या चंबूची प्रवासा दरम्यान भोजनाची अर्थात शिदोरीची जबाबदारी ही सौ. सुनंदा दहातोंडे या अगदी पहाटे उठून तयार करून द्यायच्या आणि तालुका, जिल्हा, राज्य व विद्यापीठ स्तरांवर खेळणाऱ्या खेळाडू विद्यार्थी - विद्यार्थ्यांनीच्या आहारारूपी मातृत्वाची जबाबदारी पार पडायच्या. प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा यांचे अनेक विद्यार्थी राज्य, देश आणि देशा बाहेर महत्वाच्या पदावर तसेच शासकीय सेवेत कार्यरत असतांना गुरूंनी दिलेले ज्ञान, कौशल्य, संस्कार आणि मार्गदर्शन अबाधित ठेवत त्यांची जाणीव ठेवून सदैव महाविद्यालयासह तितकेच दहातोंडे परिवाराच्या संपर्कात आहेत.
वडिल कै. हरिभाऊ दहातोंडे यांच्या आकस्मित निधनानंतर त्यांचे आत्मसात असलेले कौशल्य अर्थात हाडवैद्य कार्यानुभव म्हणून वर्ष १९७७ पासून प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा यांनी त्यांची गादी चालवली. राज्यातील विविध ठिकाणाहून येणाऱ्या हजारो रुग्णांना आरोग्यसेवा सामाजिक दातृत्व म्हणून प्रदीर्घकाळ निशुल्क प्रकारात हाडवैद्य सेवा दिली. सदर कौशल्य आणि नैपुण्य विचारात घेता पुण्यातील नामांकित रुग्णालयाने त्यांना विशेष हाड उपचार प्रक्रियेसाठी निमंत्रित तज्ञ म्हणून मानधनावर नियुक्ती बाबत विनंती केली असता, मी सदर रुग्ण सेवा ही निशुल्क प्रकारात करण्याचा संकल्प केलेला आहे. पर्यायी आपली अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. असे म्हणून हाडवैद्य प्रकारातील सेवा अखंडित निशुल्क प्रकारात सुरू ठेवली.
कौटुंबिक शिस्त आणि प्रेरणादायी मार्गदर्शनातून त्यांनी त्यांच्या कुटुंबासह आतपेष्टा मध्ये स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण केली. तसेच शिक्षणाबरोबरीने व्यक्तिमत्व विकासाला अधिक महत्व देत त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलांच्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात शिक्षणाच्या बरोबरीने मैदानी खेळ, सांस्कृतिक व साहित्यिक व्यासपीठ तसेच सेवाभावी कार्यात अधिकतम सहभागी होण्याची संधी उपलब्ध करत त्यांच्या व्यक्तित्वाला विशेष पैलू पाडले. महाविद्यालयीन जीवनात आदर्श विद्यार्थी होण्याचा मानसन्मान मिळवून मुलांनी देखील वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण केले व स्वच्छंदी परिवार (महाराष्ट्र) नावाच्या सेवाभावी संस्थेची स्थापना करून बहुसंख्येने शालेय व महाविद्यालयीन युवा-युवतीच्या शैक्षणिक कार्यात योग्यतोपरी मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करत त्यांच्या व्यक्तिमत्व तसेच व्यावसायिक कौशल्याचा विकासासाठी सर्वसमावेशक असे सामाजिक उपक्रमाचे व्यासपीठ उभारले. त्यांची कन्या सौ. जयश्री विकास नालकर व मुलगा श्री संदीप दहातोंडे हे प्रमाणित लेखापरीक्षक तर दुसरा मुलगा श्री सुदर्शन दहातोंडे हे सर्वप्रथम व्यवस्थापनशास्त्र विषयाचे प्राध्यापक व तदनंतर श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (व्यवस्थापक) या पदावर कार्यरत आहेत. प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा यांच्या जीवन तत्वज्ञान, नितीमुल्य जपत त्यांनी दिलेल्या प्रेरक, प्रेरणा व मार्गदर्शनानुसार त्यांच्या मुलांनी देखील त्यांचा जीवनप्रवास सुरू ठेवून वडिलांच्या आशीर्वादाने प्रचंड जनसंपर्क टीकवून त्यांच्या शिकवणीतून स्वच्छंदी परिवाराच्या माध्यमातून स्वतःची नवी ओळख निर्माण केली.
प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा यांनी सेवा निवृत्तीनंतर चांदा या त्यांच्या मूळ गावी वडील भाऊ प्रा. माधवराव दहातोंडे यांच्या सहयोगातून श्री सोमेश्वर पदवीधर जेष्ठ नागरिक संघटना, चांदा तसेच पुतणी कु. सुनंदा दहातोंडे ला प्रेरणा देत श्री चौढळा माता सेवाभावी प्रतिष्ठान, चांदा या संस्थेची उभारणी करत जेष्ठ व कनिष्ठ वर्गात मार्गदर्शक म्हणून सेवा सुरू ठेवली तसेच स्वच्छंदी परिवाराला प्रेरणा देत आणि आयुष्यभर जोडलेली माणसं सदैव संपर्कात ठेवली. वर्षातून - दोन वर्षातून सर्वांचा स्नेहमेळावा व्हावा म्हणून कौटुंबिक व सेवाभावी उपक्रमाचे सातत्याने आयोजन करून स्वतःवर उपकार करणाऱ्या देवमाणसांची, सहकार्य करणाऱ्या माणसांची आणि स्वतः घडवलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या जीवन प्रवासातील संगती असलेल्या सर्वांशी सोबत आणि सहसंबंध सदैव टिकून ठेवले.
वैयक्तिक संवेदनशील असलेला हा माणूस असत्य व चुकीच्या वर्तनावर अतिशय कठोर भूमिका घेण्याच्या भावनेने आक्रमक असला तरी वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात पाहिलेले, अनुभवलेले अनेक चढउतार सहन करत या पैलवानी शिक्षकांने सेवानिवृत्ती नंतर मुलं-सुन, मुलगी-जावई, नातवंडे यांत स्वतःच जीवन नावाप्रमाणे आनंदी होवून व्यथित केले. मात्र लाल-काळी मातीवरील कुस्त्या, क्रिडा, शैक्षणिक, आरोग्य, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, सेवाभावी व समाजभिमुक कार्यातील आठवणीची चर्चा ही त्याच्या उपस्थितीत अथवा अनुपस्थित सुरू झाली की प्रा. आनंदराव दहातोंडे (सर) उर्फ पै. आण्णा यांचा जीवन प्रवास अगदी तरुण होवून ऐकण्यात आणि त्यांच्या जीवन प्रवासातील थक्क करणारे अनुभव तरूण पिढीला प्रेरणा देवून जातात. अश्या या अवलीयाचे वयाच्या ७३ वर्षी *रविवार, दि. ११.०९.२०२२* रोजी *स. १०.१० वाजता* किडनीच्या उपचारा दरम्यान नाशिक येथील अपोलो हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले. एका प्रेरणादायी प्रवासाचा अलगद शेवट झाला... संपूर्ण कुटुंबासह त्यांच्या नातेवाईक, कुस्तीप्रेमी, क्रिडाप्रेमी, सांस्कृतिक, साहित्यिक, समाजभिमुक व सेवाभावी कार्यातील मित्रमंडळ तसेच जन्मभूमी व कर्मभूमीशी निगडित असलेल्या सर्व गावावर मोठी शोककळा पसरली. प्रसंगी अतिशय शोकाकुल वातावरणात शेकडोंच्या उपस्थितीत नेवासा तालुक्यातील मु. पो. चांदा या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर धर्मशास्त्रानुसार विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रा. आनंदराव दहातोंडे उर्फ पै. आण्णा हे पंचतत्वात विलीन होतांना, एक प्रेरक आणि प्रेरणादायी व्यक्तित्वाला अनंताच्या प्रवासात सद्गती मिळो म्हणून वैश्विक प्रार्थना पसायदानाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कै. प्रा. श्री. आनंदराव हरिभाऊ दहातोंडे उर्फ पै. आण्णा यांचा दशक्रियाविधी हा *मंगळवार, दि. २०.०९.२०२२* रोजी *सकाळी ८.३० वाजता* श्रीक्षेत्र प्रवरासंगम, ता. गंगापूर, जिल्हा. औरंगाबाद येथे होणार आहे.
आदरणीय सरांना सर्व माजी विद्यार्थी, सहकारी, शब्दस्नेही, स्वच्छंदी व युवक बिरादरी परिवार, महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील परिवार तसेच प्रवरा समूहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली... परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो... तसेच पुढील पिढीला त्यांच्या क्रीडा व शैक्षणिक कार्यासह जीवन व नितीमूल्याचा संस्काराच्या अनुकरणातून हा आनंदाचा प्रवास असाच चिरंतर प्रेरणा देत राहो... ही ईश्वरी शक्तीच्या चरणी विनम्र प्रार्थना...!
शब्दांकन:* यशवंत पुलाटे,
माजी विद्यार्थी व साहित्यिक