शिवप्रहार न्यूज - धार्मिक तेढ वाढवणारे मेसेज टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणारः एसपी राकेश ओला
धार्मिक तेढ वाढवणारे मेसेज टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणारः एसपी राकेश ओला
नगर (शिवप्रहार न्युज)- काही दिवसांपासून जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही समाज कंटकांकडून सोशल मीडियाव्दारे धार्मिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केले जात आहेत. यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा प्रकारचे संदेश कोणीही खात्री न करता सोशल मीडियाव्दारे प्रसारित करू नये, अन्यथा सदर इसमांविरूध्द माहिती व तंत्रज्ञान कायदा (आयटी ॲक्ट) अन्वये कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला.
जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. नुकतीच शेवगाव तालुक्यात तशी घटना समोर आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काही समाजकंटकांकडून जाणिवपूर्वक सोशल मीडियाव्दारे धार्मिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. नागरिक सदर मजकुराची कोणतीही शहानिशा न करता सदरचे संदेश पुढे पाठवित असतात. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरून कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण होत असते. कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरून (व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी) आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. नागरिकांनी ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश कोणीही खात्री न करता सोशल मीडियाव्दारे प्रसारित करू नये, अन्यथा सदर इसमांविरूध्द माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशार अधीक्षक ओला यांनी दिला आहे.
सायबर पोलिसांचा 'वॉच' धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश सोशल मीडियावर खात्री न करता पुढे प्रसारित केले जातात. यामुळे तेढ निर्माण होत असल्याचे प्रकार घडत आहे. यावर येथील सायबर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. धार्मिक तेढ निर्माण करणारे अक्षेपार्ह संदेश पसरविणार्या सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहे. अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक प्रतिक कोळी व त्यांची टिमचा सोशल मीडियावर 'वॉच' आहे.