शिवप्रहार न्यूज- दत्तजयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देवगड येथे नियोजन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न…

शिवप्रहार न्यूज- दत्तजयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देवगड येथे नियोजन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न…

दत्तजयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देवगड येथे नियोजन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न…

नेवासा(प्रतिनिधी)-नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दि.१ ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या श्री दत्तजयंती उत्सव सोहळयाची नियोजन बैठक शुक्रवारी दि.४ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. श्री क्षेत्र देवगड येथील गुरुभवन मध्ये गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन 

बैठकीत विविध विषयावर चर्चा होऊन त्यादृष्टीने नियोजन आखण्यात आले.दत्तजयंती उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मनातील दुराग्रह काढून सर्वांनी आपले कर्तव्य समजून दत्तजयंती उत्सव वैभवशाली होण्यासाठी योगदान प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज  बोलताना केले.तर यात्रेत टुकारगिरी करून भोंगे वाजवून त्रास देणाऱ्यांचा पोलीस पथके तैनात करून बंदोबस्त करणार असल्याचा ईशारा पोलीस निरीक्षक विजय करे यांनी यावेळी बोलतांना दिला.  

       यावेळी झालेल्या बैठकीप्रसंगी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या समवेत देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज,तहसीलदार रुपेश सुराणा,पोलीस निरीक्षक विजय करे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश दुबाले, नेवासा एस.टी. महामंडळाचे आगार व्यवस्थापक किशोर अहिरराव, महावितरण तंत्रज्ञ दीपक सोनवणे,सोमनाथ चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.सौरभ सुकासे,खडका प्रवरासंगमचे तलाठी अशोक गाडेकर यावेळी उपस्थित होते.

       यावेळी भक्त परिवाराच्या वतीने संतसेवक बजरंग विधाते यांनी उपस्थित अधिकारी व सेवेकरी पदाधिकारी यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.यात्रा बंदोबस्त नियोजन-सुरक्षा पार्किंग, दर्शनबारी,मंदिर परिसर वाहतूक नियंत्रण,सप्ताह काळातील वैद्यकीय सेवा सुविधा,एस टी महामंडळाच्या वतीने प्रवाशी वाहतूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संस्थान कडे येणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करून दुतर्फा असणारी झाडी झुडपे विषयी चर्चा करण्यात आली व त्यादृष्टीने संबधीत खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना करून त्या दृष्टीने योग्य नियोजन करण्याचे ठरले.

     सदर बैठकीत देवगड ते देवगडफाटा,प्रवरासंगम ते देवगड रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, यात्रा काळात पूर्णवेळ वीज पुरवठा करण्यात यावा,टारगट व्यक्तींचा बंदोबस्त करावा,प्रवरा नदीतून भाविकांना दर्शनासाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली असल्याने मच्छीमारी करणारे जाळे काढून टाकून श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची तपोभूमी खुली करावी, घाटावरील पावित्र्य राखण्यासाठी तेथे पोलीस प्रशासनाने फलक लावावेत अशा महत्वपूर्ण सूचना भाविकांकडून अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.पत्रकार सुधीर चव्हाण, पत्रकार इकबाल शेख,पत्रकार शंकर नाबदे,रावसाहेब शिंदे यांनी महत्वपूर्ण सूचना यावेळी बोलतांना केल्या.

       यावेळी बोलतांना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की सर्व अधिकाऱ्यांनी दत्तजयंती उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होण्यासाठी आपआपल्या खात्यामार्फत योगदान देण्याचा प्रयत्न करावा,परिसरातील गावांनी देखील आपल्या गावातील रस्ते स्वच्छता अभियान राबवून चांगले कसे स्वच्छ ठेवता येईल यासाठी सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न करावा, संस्थानच्या वतीने सर्व सुविधा भाविकांसाठी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल त्यासाठी देवस्थानचे वैभव वाढविण्यासाठी सर्वांच्या सुखाकरीता शिस्तीचे पालन करून नियमात राहून यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.

       यावेळी बोलतांना पोलीस निरीक्षक विजय करे म्हणाले की यात्रेत टुकारगिरी करून भोंगे वाजवून त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल यात्रेचे पावित्र्य राखण्यासाठी व शिस्तबद्ध रीतीने उत्सव पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर राहून कार्य करेल,यात्रेतील बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा तैनात केली जाईल,छेडछाड टपोरेगिरी करणाऱ्यावर व रोडरोमिओंवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांसह गुन्हे पोलीस ही सिव्हिल ड्रेसवर कार्यरत राहतील,टुकारगिरी करणाऱ्यावर तसेच धार्मिक ठिकाणी त्रास देणाऱ्या रोडरोमिओवर कडक कारवाई केली जाईल त्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात येतील असा ईशारा दिला.यासाठी नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस चौकी उभारण्यात येईल अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

    यावेळी झालेल्या बैठकीच्या प्रसंगी मुळा कारखान्याचे संचालक सेवेकरी बाळासाहेब पाटील,ज्ञानदेव लोखंडे,सरपंच अजय साबळे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे,सेवेकरी गायक रामजी विधाते,एस टी महामंडळाचे माजी अधिकारी सुरेश देवकर,बाळकृष्ण महाराज कानडे,तात्या महाराज शिंदे, बाबासाहेब खोबरे,भाऊ कोकणे,किरण धुमाळ,बाळासाहेब पटारे,एकनाथ पटारे, साहेबराव पवार,एम सी टेमकर,तात्या महाराज शिंदे,महेंद्र फलटणे,चांगदेव साबळे,संत सेवक बदामराव पठाडे,कचरू तात्या भागवत,रामेश्वर तनपुरे,बद्रीनाथ फोलाणे यांच्यासह देवगडचे सेवेकरी व भक्त परीवारातील सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.संत सेवेकरी बजरंग विधाते यांनी उपस्थित अधिकारी व भाविकांचे आभार मानले.

फोटो ओळी-नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नियोजन बैठक प्रसंगी मार्गदर्शन करतांना गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज तहसीलदार रुपेशकुमार सुराणा

पोलीस निरीक्षक विजयजी करे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश दुबाले आदी अधिकारी व भाविक दिसत आहे(छाया-सुधीर चव्हाण नेवासा)