शिवप्रहार न्यूज - अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले…
अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले…
नगर दि. 21 (जिमाका वृत्तसेवा):- अल्पसंख्यांक समाजास त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती व्हावी यादृष्टीकोनातुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाधिकारी (महसुल) उर्मिला पाटील, तहसिलदार वैशाली आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच अल्पसंख्याक समाजाच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासन निर्देशाप्रमाणे दर तीन महिन्याला बैठकीचे आयोजन करुन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावेत. अल्पसंख्याक समाजातील लाभार्थ्यांना विविध व्यवसायासाठी कर्ज मिळण्यात अडचणी येत असतील तर त्या प्रशासनासमोर सादर कराव्यात. कर्जाबाबतचे प्रश्न डीएलसीसीच्या बैठकीमध्ये घेऊन ते सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगुन उपस्थित सर्वांना अल्पसंख्याक हक्क दिनाच्या शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
कार्यक्रमास संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांबरोबरच अल्पसंख्याक समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.