शिवप्रहार न्यूज - प्रभू श्रीरामचंद्राना सिद्धी प्राप्त करून देणारे जागृत टोका येथील श्री.सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्र साजरी…
प्रभू श्रीरामचंद्राना सिद्धी प्राप्त करून देणारे जागृत टोका येथील श्री.सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्र साजरी…
महाशिवरात्री विशेष-
नेवासा -तालुक्यातील टोका-प्रवरासंगम येथील गोदावरी व प्रवरा या दोन नद्यांच्या संगमावर पुरातन महिमा असलेले व एकेकाळी काट्याकुटयात दडलेले व दुर्लक्षित असलेले श्री सिद्धेश्वर देवस्थानचे हे मंदिर महान तपस्वी महंत १००८ ब्रम्हलिन श्री बालब्रम्हचारी महाराजांच्या वास्तव्याने पुन्हा नावारूपास आले.मंदिरात होणाऱ्या वार्षिक धार्मिक कार्यक्रमामुळे या मंदिराची उत्कर्षाकडे वाटचाल सुरू झाली मात्र आज बालब्रम्हचारी महाराज हे ब्रम्हलिन झाल्याने देवगडचे महंत यांच्या मार्गदर्शनाखाली
यंदा महाशिवरात्री उत्सव मंदिर प्रांगणात साध्या पद्धतीने
साजरा होत आहे . गोदावरीच्या तीरावर असलेले श्री सिद्धेश्वर मंदिर हे सद्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे.प्रभू श्रीरामचंद्राना वनवासाच्या काळात सिद्धी प्राप्त करून देणारे टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिर हे एक जागृत क्षेत्र मानले जाते.या क्षेत्राची महती सांगणारा हा लेख
प्रभू श्रीरामचंद्रानी वनवासाच्या काळात याच मंदिरामध्ये शिवलिंगाची पूजा करून ध्यान धारणा केली होती.त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती म्हणूनच सिद्धेश्वर शिवलिंग असे नाव या देवस्थानला पडले आहे असे सांगितले जाते.सिद्धेश्वर मंदिर हे गोदावरी व प्रवरा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले तीर्थक्षेत्र आहे.प्रभू रामचंद्रांने सोनेरी हरीण(मारीच राक्षस)याला याच ठिकाणी मारले. त्यांचे काम सिद्ध झाले म्हणून प्रभू रामचंद्राने श्री.सिद्धेश्वर शिवलिंगाची स्थापना याच ठिकाणी केली आहे.याच क्षेत्राच्या वरच्या बाजूस,प्रभू रामचंद्राने भाला फेकून मारला म्हणून त्या गावचे नाव भालगाव पडले.तर समोरच्या बाजूस मारीच राक्षस रूपी सोनेरी हरणीची काया पडली म्हणून त्या गावचे नाव कायगाव पडले अशी आख्यायिका सांगितली जाते.
श्री.सिद्धेश्वर मंदिराचा परिसर प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या तीर्थक्षेत्राला ऐतिहासीक महत्व पण आहे,कारण काही काळ पेशव्यांचे वास्तव्य या गावात होते त्यांचे मोठमोठे वाडे या गावात होते,गोदावरीच्या काठावर पेशव्यांनी मोठमोठे घाट बांधलेले आहे,परंतु पैठण धरणाच्या पाण्यामुळे या गावाचे पुनर्वसन झाले आहे या मंदीरात एक सव्वा पल्ला (१३०) किलो वजनाची पंचधातूची घंटा आहे,ती चिमाजी आप्पा यांनी गोव्याहुन आणलेली आहे,मंदिराचे पूर्ण बांधकाम हे दगडात केलेले आहेत हे मंदिर विष्णू महादेव गजरे यांनी बांधलेले आहे.
पैठण धरणाच्या पाण्यामुळे या गावाचे पुनर्वसन झालेले आहे,त्यामुळे हया तिर्थक्षेत्राकडे कोणाचेही लक्ष नव्हते योगायोगाने श्री प.पू.सदगुरु १००८ बालब्रह्मचारी महाराज यांजी टोक्याला मोठे धार्मिक व सामाजिक कार्य येथे केले शेवटच्या श्वासापर्यंत उभे केले त्यामुळे या दुर्लक्षित स्थानाचा महिमा जगासमोर आला.
टोका येथे येण्यापूर्वी ब्रम्हलिन श्री.प.पू.बालब्रम्हचारी महाराज यांनी हरिद्वार येथे खूप मोठा आश्रम बांधलेला होता तेथे एक भव्य मंदिर असून एकवेळेस चाळीस लिटर दुध देणाऱ्या गाई तेथे त्यांनी आणलेल्या आहेत तेथे मोठी गोशाळा आहे,करोडो रुपये खर्च करून त्यांनी तेथे मंदिर उभे केले आहे.ते सर्व सोडून बाबाजी जम्मू येथे आले तेथे त्यांनी आपली जमीन शाळा कॉलेज,आणि वृद्धाश्रमाला दान करून ते नाशिक येथे आले नाशिक जिल्हयातील गरूडेश्वर पिंपळगाव येथे त्यांनी लोकांना द्राक्षांचे बाग कसे लावायचे आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढायचे हे शिकवले.हे सर्व करून बाबाजी टोका या गावी आले त्यावेळेस सिद्धेश्वर मंदिर हे काटेरी वनात दडलेले होते अर्धवट पडलेली येथे घरे होती मंदिराच्या आत जाण्यासाठी भीती वाटत असे बाबाजींनी मंदिराच्या भोवतीचे सर्व काटेरी कुंपणे काढून व अर्धवट पडलेली घरे हवार करून त्याठिकाणी अनेक प्रकारची झाडे फुलझाडे लावली त्यावेळेस त्या मंदिरात वीज देखील उपलब्ध नव्हती बाबाजींनी प्रयत्न करून येथे वीज उपलब्ध करून घेतली.
आज त्यांच्या प्रयत्नांनी देशातील कानाकोपऱ्यातून भक्तमंडळी या मंदिरात येत असतात मंदिरापासून नेवासा श्रीरामपूर पर्यंत रस्त्याच्या कामाची ही मंजुरी बाबाजींनी आणली व काम आज सुरू होऊन रस्ता वाहतुकीस खुला झाला आहे.दर सोमवारी मंदिरात मंदिरात धार्मिक कार्यक्रम होतात(अभिषेक,नारायण नागबळी,कालसर्प शांती,त्रिपिंडी)असे अनेक कार्यक्रम तेथे वेदशास्त्रसंपन्न ब्रम्हवृंदाच्या माध्यमातून होत असतात.तसेच गुरुपौर्णिमा व महाशिवरात्रीचा फार मोठा उत्सव साजरा केला जातो.गोदामाई भरभरून वहात असल्याने येथील पुरातन घाटावर हजारो भाविक येथे येऊन गंगास्नानाचा देखील लाभ घेतात.असा अगाध महिमा असलेल्या व प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या सिद्धेश्वराच्या दर्शनाने भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच महाशिवरात्री निमित्ताने सिद्धेश्वराची चरणी प्रार्थना
चौकट:-शेवटच्या श्वासापर्यंत भक्तांना बरोबर घेऊन सिद्धेश्वराच्या चरणी सेवा देत असतांना गुरुवर्य १००८ बाल ब्रम्हचारी महाराज अचानक लाखो भक्तांना सोडून
गेले.त्यांच्या इच्छेनुसार सिद्धेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रांगणात त्यांचा समाधी सोहळा संत महंत मंडळींच्या उपस्थितीत पार पडला येथील उत्सव परंपरा टिकविण्याची जबाबदारी आता भक्त मंडळीवर आलेली आहे.गुरुवर्य भास्करगिरी बाबाजी पाठीराखे बनून भक्तांना मार्गदर्शन करत मोठा आधार देत आहे.यावर्षीचा महाशिवरात्री उत्सव ही साध्या पद्धतीने साजरा होत आहे.बालब्रम्हचारी बाबाजींनी केलेले कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आता भक्तांवर आलेली आहे येथील उत्सवाचे वैभव सर्वांना बरोबर घेऊन दिवसेंदिवस वाढवत रहाणे हीच खरी आदरांजली त्यांना ठरणार आहे.
संकलन-पत्रकार सुधीर चव्हाण शब्दांकन-शांतवन खंडागळे टोका-प्रवरासंगम.