शिवप्रहार न्यूज - श्रीरामपुरात शिवप्रहारच्या मावळ्यांच्या मदतीने गोमांस तर बेलापूरला ५ गोऱ्हे पकडले...
श्रीरामपुरात शिवप्रहारच्या मावळ्यांच्या मदतीने गोमांस तर बेलापूरला ५ गोऱ्हे पकडले...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोडवर असणाऱ्या गायकवाड वस्ती परिसरात काल रविवारी एका पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री करीत असताना एकास पोलीसांनी पकडत त्याच्याकडून १६०० रूपयांचे गोमांस जप्त केले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, बेलापूर रोड परिसरातील शिवप्रहार प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी गायकवाड वस्ती परिसरात गोमांस विक्री होत असल्याची माहिती कळाल्यानंतर काल ११ जून रोजी त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर पशु विकास अधिकारी यांच्यासह पोलीस खासगी वाहनाने गायकवाड वस्ती परिसरात आले व त्यांनी सदर पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांचे मांस बारीक करून तोडत असताना बिलाल इस्माईल कुरेशी, वय- ५४, रा. मक्का मस्जिद शेजारी, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर याला ताब्यात घेवून त्याच्याकडून १६०० रूपयांचे गोमांस जप्त केले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात बिलाल कुरेशी याच्याविरोधात पशु संरक्षण अधिनियम १९५१ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच बेलापुरातील झेंडा चौकात एका टेम्पोमध्ये ५ दूधपिते जर्शी गोऱ्हे पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनचे पोकॉ. तमनर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दि. १० जून रोजी ३ वा. आपण बेलापूर पोलीस ठाण्यात हजर असताना एका नागरिकाने येवून सांगितले की, झेंडा चौकात आम्ही एक टाटा टेम्पो क्र. एमएच २० सीटी ३५६०. हा पकडला असून त्यात ५ दूधपिते जर्शी गोऱ्हे आहेत. त्यानंतर सदर टेम्पोकडे जाऊन चौकशी केली असता त्यातील ड्रायव्हर व शेजारी बसलेल्या इसमाला समाधानकारक उत्तरे न देता आल्याने पोलिसांनी सदर टेम्पो आणि गोहे असा एकूण १ लाख २ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून जावेद मुश्ताक कुरेशी, हारून गनी शेख यांच्याविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास पुढील पो.नि गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.