शिवप्रहार न्युज - आरटीओ कर्मचाऱ्यावर हल्लाप्रकरणी आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी...

शिवप्रहार न्युज -  आरटीओ कर्मचाऱ्यावर हल्लाप्रकरणी आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी...

आरटीओ कर्मचाऱ्यावर हल्लाप्रकरणी आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- बनावट कागदपत्रांच्या, आधारे काम करून देण्यास नकार दिला म्हणून श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात लिपीकावर- सुऱ्याने हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ, धमकी देण्याची खळबळजनक घटना काल श्रीरामपुरात घडली होती याप्रकरणील आरोपी हुजेफ युनूस जमादार याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्या न्यायाधीश श्री.यादव यांनी ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील जगन्नाथ शेवरे, वय- ३६ हे श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात कनिष्ठ लिपीक म्हणून काम करतात. काल दि. २३ नोव्हेंबर रोजी ९.४५ च्या सुमारास ते आपल्या कार्यालयात काम करीत असताना दुपारी १.३० ते २ च्या सुमारास या उपप्रादेशिक कार्यालय परिसरात एजंट म्हणून काम करणारे हुजेफ युनूस जमादार आणि शोएब युनूस जमादार हे त्यांच्याकडील वाहनधारकाचे कागदपत्र घेवून त्यांच्याकडे आले. सदर वाहनधारकाच्या वाहनावरील बोजा कमी करणे आणि वाहन हस्तांतरण करणे असे काम करून देण्याबाबत त्यांनी शेवरे यांना सांगितले. तेव्हा शेवरे यांनी त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्या कागदपत्रांतील वाहनधारकाचे नोंदणी पुस्तक वाहनावरील बोजा कमी करण्याबाबतचा कार्यालयीन फॉर्म, बँकेचा ३५ नंबर फॉर्म तसेच फॉर्म नं. २९, ३०, वाहनाचा चेसी प्रिंट आणि आधार कार्ड असे कागदपत्र त्यांनी दिल्यानंतर त्या कागदपत्रात नोंदणी पुस्तकात बनावटीकरण केलेले आढळले. सदर कागदपत्रे बनावटीकरण केलेले आणि त्यात वाहन क्रमांक आणि हस्तांतरणासाठी नाव सादर केलेल्या इसमाचा पत्ता दुसरा आणि आधार कार्ड ज्यावरील आधार नंबर काळया शाईने खोडलेले होते. त्यामुळे शेवरे यांनी हुजेफ जमादार आणि शोएब जमादार यांना याची कल्पना देवून सदर कागदपत्र तुम्हाला परत न देता ते वरिष्ठांकडे योग्य कारवाईसाठी देणार असल्याचे सांगितले. तेव्हा हुजेफ जमादार याने 'तू ...जातचा आहे, हमको सिकाएगा क्या कौनसा पेपर सही है और गलत है, हमे मालूम है, पेपर गलतभी होत तो ये काम कर', असे म्हणत शिवीगाळ केली. तेव्हा शेवरे लगेच कॅबिनमधून दरवाजा उघडून बाहेर येत असताना हुजेफ याने त्याचा शर्ट वर करून पाठीमागून एक सुरा काढला आणि शेवरे यांची गचांडी धरून त्यांच्या तोंडावर, डोक्यावर बुक्के मारले आणि हातातील सुऱ्याची मूठ डोक्यात मारून शेवरे यांना दिलेले पेपर त्याने हिसकावून घेतले. शेवरे यांना दोघांनी मारहाण करून शिवीगाळ करत 'तुम बाहरवाले हो यहापे चुपचाप काम करनेका, कौनसा कागज सही होता है नही देखनेका' असे म्हणत 'तू बाहर मिल, तेरेको दिखाता हूँ' अशी धमकी देवून निघून गेले.

    याप्रकरणी लिपीक सुनील शेवरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हुजेफ युनूस जमादार आणि शोएब युनूस जमादार यांच्याविरोधात भादंवि कलम १४६, ३३२, ३४, ३५३, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्यांचार प्रतिबंध अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(आर) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.