शिवप्रहार न्युज - गायांची गाडी पोलिस स्टेशनला आणल्यावरून खूनाचा प्रयत्न...

शिवप्रहार न्युज -  गायांची गाडी पोलिस स्टेशनला आणल्यावरून खूनाचा प्रयत्न...

गायांची गाडी पोलिस स्टेशनला आणल्यावरून खूनाचा प्रयत्न...

   श्रीरामपर (शिवप्रहार न्युज)- पोलिसांनी पकडलेली गायांची गाडी पोलिस स्टेशनला चालवत आणल्याच्या रागातून दोघांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनच्या आवारात घडला. त्यानंतर रात्री उशिरा श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच वेस्टन चौकात देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की, अशोकनगर येथील निर्मळ आणि त्यांचे मित्र मापारी हे दोघे काल गुरुवारी रात्री अशोकनगरहून श्रीरामपूरकडे येत - असताना त्यांना आरबीएनबी - कॉलेजकडे जाणाऱ्या - बोगद्याजवळ जमावाने एक टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची झेनॉन गाडी क्र. एम.एच. १७- ए.जी. ८२५४ ही आडवलेली दिसली तेंव्हा सदर गाडीमध्ये गाया होत्या. त्यानंतर पोलिसांनी तेथे येऊन गाडी कोणाला चालवता येते का ? असे विचारले असता निर्मळ यांनी होकार दिल्याने त्यांना ही झेनॉन गाडी चालवत नेवून पोलिस स्टेशनला नेण्यास सांगितले. तेंव्हा निर्मळ यांनी गाडी पोलिस स्टेशनला आणली. त्यानंतर गाडी घेऊन आलेले निर्मळ व राहुल हे पोलिस स्टेशन आवारातच उभे होते. पोलिस स्टेशनच्या आवारात वसीम कुरेशी, शाहीद कुरेशी, बुंदी कुरेशी, शाहरुख कुरेशी, तौफिक महेमूद कुरेशी, मोहसीन कुरेशी, अदनान शब्बीर कुरेशी, सदाम कुरेशी, इरफान शेख, शाहरुख कल्लूबाबा कुरेशी यांनी येऊन गाडी चालवत घेऊन आणलेल्या निर्मळ यांना तु गाडी का चालवत आणली. तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत सर्वांनी निर्मळ व मापारी यांना रिंगण करुन मारहाण केली. मारहाण करत असताना मोहसीन कुरेशी याने निर्मळ यांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुटका करुन घेतली असता पुन्हा शाहीद कुरेशी याने कमरेच्या पट्टा निर्मळ यांच्या गळ्यात टाकून आवळला. 

      तसेच शाहरुख कुरेशी याने यावेळी धारदार शस्त्राने निर्मळ यांच्या पोटात वार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हुकवल्याने त्यांच्या बोटाला दुखापत झाली. तसेच आरोपींनी आमच्या नादी लागले तर जिवंत सोडणार असा दम दिल्याचे निर्मळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून याप्रकरणी पोलिस स्टेशनच्या आवारात खून करण्याचा प्रयत्न करणारे आरोपी वसीम कुरेशी, शाहीद कुरेशी, बुंदी कुरेशी, शाहरुख कुरेशी, तौफिक महेमूद कुरेशी, मोहसीन कुरेशी, अदनान शब्बीर कुरेशी, सद्दाम कुरेशी, इरफान शेख, शाहरुख कल्लूबाबा कुरेशी सर्व रा.कुरेशी मोहल्ला, श्रीरामपूर यांच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

       दरम्यान श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. नितीन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींपैकी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच कोणीही आफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये विनाकारण शहराचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पो.नि. नितीन देशमुख यांनी दिला आहे.