शिवप्रहार न्यूज - संभाव्य तिसऱ्या लाटेतही अर्थचक्र सुरळीत राहील यासाठी प्रयत्न- जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले...
संभाव्य तिसऱ्या लाटेतही अर्थचक्र सुरळीत राहील यासाठी प्रयत्न- जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले...
अहमदनगर:कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मात्र, या लाटेत जिल्ह्यातील अर्थचक्र सुरळीत सुरु राहील, त्यादृष्टीने कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करुन उद्योजक आणि व्यापारी असोसिएशन कशा प्रकारे उद्योग सुरु ठेवू शकतील, यासंदर्भात जिल्ह्याचा आराखडा तयार करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले.
याविषयी उद्योजक तसेच व्यापारी असोसिएशन यांच्याशी जिल्हापातळीवर बैठक आयोजित करण्यात येणार असून उपविभागीय पातळीवरही उपविभागीय अधिकाऱ्यांना अशा बैठकीचे आयोजन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणांचा कोरोना उपाययोजना आणि सद्यस्थितीसंदर्भात आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राजूरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दहिफळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालयातून तर तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या काही भागात वाढताना दिसत आहे. तेथे अतिशय काटेकोरपणे उपाययोजना राबविल्या गेल्या पाहिजेत. संसर्ग फैलावणाऱ्या घटकांवर तात्काळ कारवाई करुन कोविड सुसंगत वर्तणूकीचे पालन होईल, यासाठी यंत्रणांनी पावले उचलावीत. सध्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आपण तयारी करत आहोत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय पूर्ण बंद राहिले. त्यामुळे अर्थचक्र पूर्णपणे थांबल्याचे चित्र होते. संभाव्य तिसऱ्या लाटेत अर्थचक्र सुरळीत सुरु राहावे, या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र तसेच व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाणार आहे. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योग प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. त्या अनुषंगाने मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून आढावा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात साधारणता तीन हजार उद्योग असून त्याठिकाणी एक लाखाहून अधिक कामगार काम करीत आहे. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत कशाप्रकारे हे उद्योग सुरु ठेवता येतील, यासंदर्भात या उद्योजक प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. बराचसा कामगार वर्ग हा बाहेरुन ये- जा करणारा असतो. त्यामुळे तो प्रतिबंधीत क्षेत्रातून येणारा नसावा, तसेच त्याला कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करता येईल का, कामगारांच्या जाण्या येण्याची व्यवस्था करणाऱ्या बसेस निर्जंतुक केलेल्या असणे आदी मुद्द्याबाबत आणि त्या अनुषंगाने ते काय उपाययोजना करु शकतात, याची माहिती घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. ज्याप्रकारे जिल्हास्तरीय पातळीवर उद्योजकांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे, त्याचप्रकारे उपविभागीय अधिकारी यांनी त्या-त्या भागातील उपविभाग-तालुकास्तरावरील उद्योजक, व्यापारी यांच्याशी चर्चा करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.