शिवप्रहार न्यूज -वाळू तस्करी विरोधात डीवायएसपी मिटके आक्रमक;श्रीरामपुरात दोन खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल

वाळू तस्करी विरोधात डीवायएसपी मिटके आक्रमक;श्रीरामपुरात दोन खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल...
श्रीरामपूर- वाळू तस्करी वरून दोन टोळ्यांमध्ये झालेल्या वादातून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एक व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात एक असे दोन खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे काल दिनांक 10 जून 2021 रोजी रात्री उशिरा दाखल करण्यात आले आहे.
श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 170/ 2021 कलम 307,308 वगैरे या गुन्ह्याची घटना गोंडेगाव येथील श्री.स्वामी समर्थ मंदिरा जवळ घडली असून या गुन्ह्यातील फिर्यादीने सात जणांविरोधात तक्रार दिलेली आहे.
तर दुसऱ्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 359/2021 भादवि कलम 307,308,143,147 वगैरे या गुन्ह्याची घटना गोंधवणी रोड,दत्त मंदिराच्या पाठीमागे,वार्ड नंबर ०१ या ठिकाणी घडली असून या गुन्ह्यातील फिर्यादीने एकूण अकरा ते बारा जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
या दोन्ही तक्रारींची तात्काळ दखल घेऊन श्रीरामपूर चे डीवायएसपी श्री.संदीप मिटके यांनी आक्रमक पवित्रा घेऊन वरीलप्रमाणे दोन कलम 307 खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केले आहेत. तालुका पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री.साळवे हे करीत असून शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप हे करीत आहेत.
एकीकडे पूर्वाश्रमीचे मित्र असलेल्या या वरील दोन टोळ्या वाळूतस्करी कोणी करायची यावरुन भांडत असताना दुसरीकडे उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी वाळू तस्करांची टोळी ही गपगुमानपणे, बेसुमार वाळू उपसा करत आहेत. श्रीरामपूर शहरातील अनेक बिल्डरांच्या बांधकामांना या टोळीकडून वाळू पुरविली जाते.या टोळीला एका मोठ्या राजकीय पक्षाचा व नेत्याचा वरदहस्त लाभलेला आहे. शक्यतो कोणाशी वाद न घालता ही टोळी वादापासुन अलिप्त राहून आपला वाळू तस्करी चा धंदा वर्षानुवर्षापासुन राजरोसपणे व जोरदारपणे करत आहे.