शिवप्रहार न्यूज- भर दिवसा श्रीरामपूर शहरात बिबट्याचा अनेकांवर हल्ला;लहान मुलांसह नागरिक जखमी…
भर दिवसा श्रीरामपूर शहरात बिबट्याचा अनेकांवर हल्ला;लहान मुलांसह नागरिक जखमी…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती भागातील सदावर्ते हॉस्पिटल व झावरे मोटर्सच्या मागील भागामध्ये मोहटा देवी मंदिर रोड परिसरात बिबट्याने प्रवेश करून एका लहान मुलीवर व मुलावर हल्ला चढवला.
याबाबत अधिक माहिती अशी की,आज सकाळी सुरूवातीला साडेअकराच्या सुमारास गुलाब झांजरी यांच्या घराच्या परिसरात बिबट्या दिसला.त्यावेळी त्याने झाजरी यांच्या सुनेकडे क्लाससाठी येणाऱ्या श्रद्धा हिंगे,वय-११ नावाच्या मुलीवर हल्ला करून तिच्या हाताला जखमी केले. यावेळी श्रद्धा हिंगे हिचे वडील देखील तिच्यासोबत होते.त्यानंतर या बिबट्याने ऋषभ अंबादास निकाळजे या मुलाला देखील हल्ला करून जखमी केले. त्यानंतर पुढे बिबट्याने अनेक नागरिकांना जखमी केल्यानंतर तो बिबट्या झावरे मोटर्सच्या मागील भागामध्ये असलेल्या गल्लीत झाडाझुडुपांमध्ये लपून बसलेला आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केलेली दिसून आली.जवळपास हजार एक हजाराहून अधिक नागरिक या ठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी जमल्याचे दिसते.बिबट्याला पकडण्यासाठी प्रशासन देखील येथे पोहोचले असून अप्पर पोलीस अधिक्षक डॅाक्टर दिपाली काळे,तहसीलदार श्री.प्रशांत पाटील पोलीस निरीक्षक, श्री.सानप यांच्यासह फौज फाटा घटनास्थळावर दाखल झालेला आहे.परंतु बिबट्याला पकडण्यात सर्वात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारा वनविभाग मात्र अनेकांनी फोन करून देखील अद्यापपर्यंत घटनास्थळावर आलेला नाही.यामुळे नागरिकांनी चीड व्यक्त केली आहे.