शिवप्रहार न्यूज- शिर्डीत श्रीरामनवमी उत्‍सवाची तयारी पुर्ण…

शिवप्रहार न्यूज- शिर्डीत श्रीरामनवमी उत्‍सवाची तयारी पुर्ण…

शिर्डीत श्रीरामनवमी उत्‍सवाची तयारी पुर्ण…

शिर्डी -

            श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने शनिवार दिनांक ०९ एप्रिल २०२२ ते सोमवार दिनांक ११ एप्रिल २०२२ अखेर साजरा करण्‍यात येणा-या श्रीरामनवमी उत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असून याकालावधीत विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले आहेत.

              श्रीरामनवमी उत्‍सवाची सुरुवात १९११ मध्‍ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्‍यात आली. तेंव्‍हापासून प्रतीवर्षी हा उत्‍सव मोठ्या उत्‍साहाच्‍या वातावरणात शिर्डी येथे साजरा केला जातो. उत्‍सवात होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून दर्शनाची व्‍यवस्‍था सुखकर व्‍हावी याकरिता उन्‍हापासून संरक्षणासाठी मंदिर परिसरात, नविन पिंपळवाडी रोड, गेट नंबर ०४ ते व्‍दारकामाई व चावडी परिसर, साई उद्यान आणि श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी सुमारे ९७ हजार चौ.फुट मंडप उभारण्‍यात आलेले आहे. तसेच साईभक्‍तांच्‍या अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थे करीता साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) व साईधर्मशाळा याठिकाणी सुमारे ३२ हजार चौ.फुट बिछायत व कनातीसह मंडपाची उभारणी करण्‍यात आलेली असून यामध्‍ये विद्युत, पाणी पुरवठा, स्‍वच्‍छतागृह व सुरक्षा व्‍यवस्‍था ठेवण्‍यात आलेली आहे. याबरोबरच मुंबई व परिसरातून पालखी सोबत येणा-या पदयात्रींची निवा-याची सोय सुयोग्‍य होण्‍यासाठी संस्‍थानच्‍या वतीने मुंबई ते शिर्डी महामार्गावर ठिकठिकाणी सुमारे ०१ लाख १७ हजार चौ.फुट कापडी मंडप कनात बिछायतीसह उभारण्‍यात आलेले असून यामध्‍ये विद्युत व पाणी पुरवठ्याची सोय करण्‍यात आलेली आहे. याकामी कोपरगांव येथील वाल्‍मीकराव कातकडे यांनी विनामुल्‍य १० पाण्‍याचे टॅकर चालकासह दिलेले असून याकरीता संस्‍थानच्‍या वतीने इंधन खर्च करण्‍यात येत आहे. तसेच पालख्‍या शिर्डी येथे आल्‍यानंतर पदयात्रींची साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. सिन्‍नर ते शिर्डी या मार्गावर पदयात्रींना आवश्‍यकतेनूसार तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्‍ध व्‍हावी यासाठी फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्‍यात आले आहे.

              तसेच गुरुस्‍थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा, दर्शनरांग, नविन भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), साईआश्रम, श्री साईप्रसादालय व मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडप आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु राहणार असून या ठिकाणी तातडीच्‍या वैद्यकीय सेवेसाठी रुग्‍णवाहीका ही तैनात करण्‍यात आलेल्‍या आहेत. भाविकांना श्रींच्‍या दर्शनासाठी येणे-जाणेकरीता श्री साईआश्रम, श्री साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान, श्री साई धर्मशाळा व श्री साईप्रसादालय आदि ठिकाणाहुन जादा बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी श्री साईमंगल कार्यालय, व्‍दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्‍प्‍लेक्‍स, श्री साईप्रसादालय व सर्व निवासस्‍थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आले असून आवश्‍यकता भासल्‍यास अतिरिक्‍त लाडू विक्री केंद्र उभारण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. तसेच श्री रामनवमी उत्‍सवानिमित्‍त समाधी मंदिर व परिसरात भुवनेश्‍वर येथील दानशूर साईभक्‍त सदाशिब दास यांच्‍या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट व शिंगवे येथील ओम साई लाईटींग डेकोरेटर्स निलेश नरोडे यांच्‍या वतीने विद्युत रोषणाई करण्‍यात येणार आहे.

            श्री रामनवमी उत्‍सवानिमित्‍ताने शनिवार, दिनांक ०९ एप्रिल रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ५.४५ वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, सकाळी ०६.०० वा. व्‍दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ०६.२० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, दुपारी १२.३० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद आदि कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४.०० वा. ते सायं.६.०० यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर ह.भ.प.विक्रम नांदेडकर, श्रीमद सदगुरु श्री.दासगणु महाराज प्रतिष्‍ठाण, गोरटे, नांदेड यांचे कीर्तन कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६.३० वा.धुपारती होणार आहे. सायं.७.३० ते रात्रौ ०९.५० यावेळेत श्री.निनाद ग्रुप-सौ.पद्यावती पारेकर, पुणे यांचा भक्‍ती संगीत हा कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ९.१५ वा. चावडीत श्रींच्‍या पालखीची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. मिरवणूक परत आल्‍यानंतर रात्रौ १०.०० वा. शेजारती होईल. या दिवशी पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे.

            उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रविवार, दिनांक १० एप्रिल रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ५.४५ वा. अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींच्‍या फोटो व पोथीची मिरवणूक होईल. सकाळी ०६.२० वा. कावडींची मिरवणूक व श्रींचे मंगलस्‍नान होईल. सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर ह.भ.प.विक्रम नांदेडकर यांचे श्रीरामजन्‍म किर्तन कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वा. माध्‍यान्‍ह आरती होणार आहे. दुपारी ४.०० वा. निशाणांची मिरवणूक तर सायं.५.०० वा. श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्‍यानंतर सायं.६.३० वा. धुपारती होईल. सायं.७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत विजय साखरकर, मुंबई यांचा साई स्‍वर नृत्‍योत्‍सव हा कार्यक्रम होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. तसेच हा उत्‍सवाचा मुख्‍य दिवस असल्‍याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. यामुळे दिनांक १० एप्रिल रोजीची नित्‍याची शेजारती व दिनांक ११ एप्रिल रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.

             उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सोमवार, दिनांक ११ एप्रिल रोजी पहाटे ५.०५ वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ०७.०० वा. गुरुस्‍थान मंदिरामध्‍ये रुद्राभिषेक, सकाळी १०.०० वा. ह.भ.प.विक्रम नांदेडकर यांचे गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, सायं.६.३० वा. धुपारती होणार असून सायं.७.३० ते रात्रौ ०९.५० यावेळेत अक्षय आयरे, मुंबई यांचा सुस्‍वागतम रामराज्‍य नृत्‍य-नाटिका हा कार्यक्रम होणार आहे. तर रात्रौ १०.०० वा. श्रींची शेजारती होईल.

            उत्‍सव कालावधीमध्‍ये रोज सायं. ७.३० ते रात्रौ ०९.५० यावेळेत निमंत्रीत कलाकारांचे कार्यक्रम मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार आहेत. उत्‍सवाचे निमित्‍ताने व्‍दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्रीसाईसच्‍चरिताच्‍या अखंड पारायणामध्‍ये जे साईभक्‍त भाग घेवू इच्‍छीतात अशा साईभक्‍तांनी आपली नावे शुक्रवार दिनांक ०८ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १.०० वा. ते सायंकाळी ५.३० वा. यावेळेत देणगी काऊंटर नंबर ०१ येथे नोंदवावीत. त्‍याच दिवशी सोडत पध्‍दतीने पारायणसाठी भक्‍तांची नावे सायंकाळी ५.३५ वा. समाधी मंदिरातील व्‍यासपीठावर निश्चित करण्‍यात येतील. तसेच दिनांक १० एप्रिल या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी होणारे कलाकारांचे हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकरांनी आपली नावे त्‍याच दिवशी समाधी मंदिराशेजारील अनाऊन्‍समेंट सेंटरमध्‍ये मंदिर कर्मचा-याकडे आगाऊ नोंदवावीत. तसेच सर्व साईभक्‍तांनी या उत्‍सवास उपस्थित राहून उत्‍सवाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले आहे. 

            सदरचा उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे अध्‍यक्ष ना.आशुतोष काळे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व सर्व विश्‍वस्‍त यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे मुख्‍यलेखाधिकारी तथा प्रभारी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, संरक्षण विभाग प्रमुख आण्‍णासाहेब परदेशी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहेत.