शिवप्रहार न्यूज- साईभक्तांसाठी शिर्डीवरुन खुषखबर…

साईभक्तांसाठी शिर्डीवरुन खुषखबर…
शिर्डी -
श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या व्यवस्थापन मंडळाने व्दारकामाईत दर्शनासाठी स्वतंत्र दर्शन रांग सुरु करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला असून आज दिनांक २० जानेवारी रोजी गुरुवारच्या शुभ मुहूर्तावर माध्यान्ह आरतीनंतर व्दारकामाई मंदिराचे दक्षिण बाजुचे गेट उघडुन भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग सुरु करण्यात आली.
गेल्या वर्षी जगभरात व देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे दि १७ मार्च २०२० रोजी श्रींचे समाधी मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर दि.१४ नोव्हेंबर २०२० रोजीच्या शासन आदेशान्वये दि.१६ नोव्हेंबर २०२० पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आले होते. त्यावेळेस शासनाच्या आदेशान्वये मंदिरामध्ये प्रवेशासाठी व बाहेर जाण्याची स्वतंत्र गेट असावे, मार्गदर्शक सुचना होत्या. त्यानुसार श्री साईबाबांचे समाधीचे दर्शन घेताना व्दारकामाई मंदिरात दर्शनासाठी वेगळी रांग लावु नये म्हणुन मुख्य दर्शन रांगेतुनच भाविकांना व्दारकामाईचे दर्शन दिले जात होते.
यापुर्वी कोरोना विषाणूच्या संकटामुळे दोन वेळा राज्य शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा श्री साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले तेव्हा साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांकडून व्दारकामाई मंदिराचे दक्षिण बाजुचे गेटमधुन थेट दर्शन मिळावे अशी मागणी वारंवार होत होती. त्यानुसार संस्थानचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे व विश्वस्त मंडळाने दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजीच्या सभेत व्दारकामाईकरीता स्वतंत्र मंदिर समजुन त्याची स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला.
तरी भाविकांनी कोव्हीड १९ चे संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन श्रींच्या व्दारकामाई मंदिरात दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच सर्व साईभक्तांनी व शिर्डी ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन संस्थान व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे व सर्व विश्वस्त मंडळ सदस्य यांनी केले.