शिवप्रहार न्युज - दारुड्यांना प्रवेश नाही म्हटल्याने नवीन स्विमिंग टॅंक चालकास दांड्याने मारहाण...

दारुड्यांना प्रवेश नाही म्हटल्याने नवीन स्विमिंग टॅंक चालकास दांड्याने मारहाण...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- दारू पिलेल्यांना स्विमिंग करू देत नाही असे म्हणाल्याचा राग येवून श्रीरामपूर येथे नव्याने झालेल्या ज्ञानसाई हेल्थ क्लब येथे दोघांनी धिंगाणा घालत चालकाला दांड्याने मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सूरज राजकुमार यादव, रा. वॉर्ड नं. ६, केव्ही रोड श्रीरामपूर याने नितीन गवारे यांच्याकडून ओव्हरब्रीज येथे नव्याने झालेल्या ज्ञानसाई हेल्थ क्लब भाडेतत्वावर चालवायला घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी सूरज यादव व सहकारी कर्मचारी स्विमींग टँकवर असताना त्या ठिकाणी सुनील साळवे व गवळीराम साळवे हे दोघे दारू पिऊन आले.तेव्हा काउंटरवर बसलेल्या यादव यांना त्यांच्या तोंडाचा वास आला. तेव्हा यादव म्हणाला की, दारू पिणाऱ्याला स्विमींग करू देत नाही. याचा राग आल्याने सुनील साळवे व गवळीराम साळवे हे दोघे स्विमींग टँककडे गेले व त्यांनी कर्मचाऱ्यांना मोठमोठयाने शिवीगाळ करून कानामागे मारल्या. तसेच लहान मुलांच्या स्विमींग टँकचे साहित्य फेकून दिले. तेव्हा यादव यांनी कामगारांना मारहाण करू नका, असे म्हणाले असता तुम्ही आम्हाला ओळखत नाही, आम्ही येथीलच आहोत, असे म्हणत अशोकनगरच्या काही जणांना त्यांनी फोन केले. त्यानंतर यादव यांनाही मारायला सुरूवात केली. त्यानंतर अशोकनगरहून आलेल्या काही मुलांनी हातातील दांड्याने यादव व त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर यादव यांची गचांडी धरून त्यांच्या गळयातील सोन्याची चैन तसेच खिशातील पैसे काढून घेवून आरोपी तेथून निघून गेले.
दरम्यान मालक नितीन गवारे, सतीश गवारे यांनी यादव याला साखर कामगार रूग्णालयात उपचारासाठी ॲडमिट केल्याचे फिर्यादीत म्हटले असून सदर फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.