शिवप्रहार न्यूज- शिर्डीत साई संस्थान च्या वतीने शिर्डी महोत्सव…

शिवप्रहार न्यूज- शिर्डीत साई संस्थान च्या वतीने शिर्डी महोत्सव…

शिर्डीत साई संस्थान च्या वतीने शिर्डी महोत्सव…

शिर्डी-

         श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या वतीने सालाबादप्रमाणे या वर्षीही दिनांक ३१ डिसेंबर हा दिवस शिर्डी महोत्‍सव म्‍हणुन साजरा करण्‍यात येत असून नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त होणारी संभाव्‍य गर्दी व कोरोना विषाणुच्‍या पार्श्‍वभुमीवर श्रींच्‍या दर्शनाकरीता येतांना भाविकांनी आपली गैरसोय टाळण्‍यासाठी ऑनलाईन दर्शन पास घेवुनच शिर्डीला यावे. तसेच दरवर्षी नियमित पालखी घेऊन येणा-या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी आणू नये, असे आवाहन संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले.

           श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, श्री साईबाबांवर श्रध्दा असणारे असंख्य भाविक दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त शिर्डीला येवून श्रींच्‍या समाधीचे दर्शन घेतात व महाराष्‍ट्रसह इतर राज्‍यांतुन शेकडो पालख्‍यांसह पदयात्री शिर्डीत हजेरी लावतात. परंतु यावर्षीही पुन्‍हा संपुर्ण देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आलेले होते. त्‍यामुळे यावर्षी व मागिल वर्षी संस्‍थानच्‍या वतीने साजरे करण्‍यात येणारे श्री रामनवमी, श्री गुरुपौर्णिमा व श्री पुण्‍यतिथी आदी उत्‍सव अतिशय साध्‍या पध्‍दतीने व भाविकांविना साजरे करण्‍यात आलेले आहेत. तसेच या सर्व उत्‍सवामध्‍ये पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये, असे आवाहन ही संस्‍थानच्‍या वतीने वेळोवेळी पदयात्री साईभक्‍तांना व पालखी मंडळांना करण्‍यात आले होते.

         शासनाच्‍या वतीने दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. परंतु राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोंबर २०२१ पासून काही अटी/शर्तीवर धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले होते. त्‍यानुसार श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले असून ठरावीक संख्‍येने भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. परंतु अजुनही कोरोनाचे सावट संपले नसुन सर्व साईभक्‍तांनी आपल्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने काळजी घेणे आवश्‍यक आहे. तसेच संस्‍थानच्‍या वतीने विविध उपाययोजना ही करण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍यामुळे नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त शनिवार दिनांक २५ डिसेंबर २०२१ ते रविवार दिनांक ०२ जानेवारी २०२२ याकालावधीत गर्दी होवु नये म्‍हणुन साईभक्‍तांनी शिर्डी येथे श्रींचे दर्शनाकरीता येतांना संस्‍थानच्‍या online.sai.org.in या संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन पास निश्चित झाल्‍यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे. तसेच अधिक माहितीसाठी संस्‍थानच्‍या www.sai.org.in या संकेतस्‍थळावर संपर्क साधावा.

           तरी कोरोना विषाणुच्‍या पार्दुभावामुळे श्रींच्‍या दर्शनाकरीता ठरावीक संख्‍येने मंदिरात प्रवेश दिला जात असल्‍यामुळे व दर्शन पास वितरण काऊंटरवर होणा-या गर्दीमुळे आपली होणारी गैरसोय टाळण्‍याकरीता ऑनलाईन बुकींग निश्चित करुनच साईभक्‍तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे, अन्‍यथा आपली गैरसोय होवु शकते. तसेच राज्‍य शासनाच्‍या निर्देशानुसार भाविकांनी मास्‍क लावणे, वारंवार हात सॅनिटायझेशन करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे व दर्शनास प्रवेश करताना दर्शनरांगेतील इतर वस्‍तुंना आणि श्रींच्‍या समाधीस स्‍पर्श करु नये. याशिवाय मंदिरात फुलं, हार, प्रसाद व इतर पूजेचे साहीत्‍य नेण्‍यास सक्‍त मनाई आहे. याबरोबरच जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये. पदयात्री साईभक्‍तांनी व पालखी मंडळांनी पालखी शिर्डी येथे आणू नये. तरी सर्व साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी याबाबत संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन ही श्रीमती बानायत यांनी केले.