शिवप्रहार न्युज - औषध पाजून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार;श्रीरामपूरच्या मित्रावर गुन्हा…
औषध पाजून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार;श्रीरामपूरच्या मित्रावर गुन्हा…
श्रीरामपूर/अहिल्यानगर- (शिवप्रहार न्युज)- गुंगीचे औषध पाजून एका तरुणीवर तिच्या परिचित मित्रानेच अत्याचार केला आहे. ही घटना अहिल्यानगर - पुणे महामार्गावरील चास शिवारातील एका लॉजमध्ये घडली. प्रजासत्ताक दिनीच म्हणजे २६ जानेवारीला हा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी एका २३ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार अहमद हसन सय्यद (रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी आहे की, मूळची श्रीरामपूर येथील व सध्या नोकरी निमित्त पुणे येथे एक २३ वर्षीय तरुणी राहत आहे. ती शिक्षण घेत असताना तिच्या वर्गातच काही वर्षापूर्वी अहमद हसन सय्यद हा होता. त्यामुळे दोघांची ओळख झाली. त्यांचे एकमेकांसोबत व्हॉटसअॅप या सोशल मीडिया माध्यमातुन,तर कधी मोबाईलद्वारे संपर्क होत होता. ती तरुणी नातेवाईकांच्या लग्न समारंभाकरिता पुण्याहून श्रीरामपूर येथे आली होती. त्यानंतर २६ जानेवारी रोजी ती पुणे येथे जाण्यासाठी श्रीरामपूर बस स्थानकावर गेली. त्यावेळी तिला अहमद सय्यद याचा फोन आला. तो तिला म्हणाला की,”मी पण पुण्याला चाललो आहे. तु माझ्यासोबत माझ्या गाडीमध्ये चल” असे म्हणाला.
तरी तो ओळखीचा असल्याने ती त्याच्या स्वीप्ट कार (क्र. एम एच १२ जे एच २११२) मध्ये बसली. ते राहुरीच्या पुढे आल्यानंतर तिला उलटी आल्यासारखे होऊ लागल्याने अहमद याने तिला त्याच्या गाडीमध्ये असलेली पाण्याची बाटली दिली. त्यानंतर ते नगर पास करुन पुढे गेले असता तिला चक्कर येऊ लागली. त्यामुळे तिने अहमद याला गाडी रोडच्या कडेला थांबवण्यास सांगितले. त्यावर अहमद म्हणाला की, आपण रोडवर न थांबता समोर असलेल्या लॉजवर जाऊ, तु तेथे फ्रेश हो त्यावर तिने त्याला नको सांगितले. परंतु त्याने आग्रह करुन एका लॉजमध्ये नेले. त्यावेळी अहमदने तिला पुन्हा पिण्यासाठी पाणी दिले. पाणी पिल्याने तिला आणखीनच चक्कर येऊ लागल्यावर अहमद हा तिच्याशी लगट करू लागला. त्यास तिने विरोध केला मात्र गुंगीचा अंमल असल्याने तिचा विरोध तोकडा पडला व अहमद याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार,बलात्कार केला.
नंतर त्या तरुणीने हा प्रकार तिच्या घरच्यांना फोन करून सांगितला व त्यांना चास येथे बोलावून घेतले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अहमद हसन सय्यद,रा.खंडाळा, ता. श्रीरामपूर याचेविरुध्द गुन्हा दाखल केला असून सदर घटना नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने सदर गुन्हा पुढील तपासासाठी नगर तालुका पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.