शिवप्रहार न्यूज - आम्ही कॉलेजचे डॉन; नडायचे नाही...‘अजितदादा’ कॉलेजच्या सिक्युरिटी गार्डला बेदम मारहाण…

आम्ही कॉलेजचे डॉन; नडायचे नाही...
‘अजितदादा’ कॉलेजच्या सिक्युरिटी गार्डला बेदम मारहाण…
श्रीरामपूर(प्रतिनिधी)-कॉलेजच्या गेटला गाडी आडवी लावली म्हणुन जाब विचारणार्या अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेजच्या सिक्युरिटी गार्डला 5-7 जणांच्या टोळयांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला असून ‘आम्ही कॉलेजचे डॉन आहोत, आम्हाला नडायचे नाही. नाहीतर असाच मार खावा लागेल’, असा दमही या आरोपींनी दिला आहे.
याबाबत पवन नानासाहेब हिवाळे, वय-26, धंदा-सिक्युरिटी गार्ड, रा.भोकर, ता.श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी शिवा ट्रस्ट संचलित अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळामहादेव येथे कॉलेजच्या मेन गेटवर सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीस आहे. दि.5 नोव्हेंबरला डयुटीवर असताना कॉलेजचा मॅकेनिकल थर्ड इयरचा ब्राम्हणे नावाचा विद्यार्थी विनाकारण रस्त्यात गाडी आडवी लावून येणार्या जाणार्या विद्यार्थ्यांना पाहून मोठयाने गाणी म्हणत होता. म्हणून मी त्याला हटकले आणि गाडी बाहेर घेवून जाण्यास सांगितले. याचा राग धरत त्याने शिवीगाळ करत तुला पाहून घेईल अशी धमकी देवून गेला.
त्यानंतर दि.8 नोव्हेंबर रोजी मी डयुटीवर असताना दुपारी 1 च्या सुमारास ब्राम्हणे हा सात-आठ अनोळखी लोकांना मोटारसायकलवर घेवून आला. मोटारसायकल लांब लावत ते माझ्याजवळ आले त्यात सागर इंगळे, सोनु शिंदे व सागर वायकर या वडाळामहादेव गावातील तिघांना मी ओळखत होतो. एका आरोपीच्या हातात तलवार, दुसर्याच्या हातात लोखंडी गज आणखी एकाच्या हातात लोखंडी फायटर तसेच इतरांनी कंबरेचे बेल्ट काढून सर्वजण शिवीगाळ करत माझ्या अंगावर धावून आले. सर्वांनी माझ्यावर हल्ला केला. मला बेदम मारहाण केल्याने मी खाली कोसळलो असता माझ्या चेहर्यावर ब्राम्हणे याने पाय ठेवून इतरांनी मला मारहाण केली. यावेळी कॉलेजचे शिपाई नवनाथ आसने, ड्रायव्हर सतीश सरोदे हे मला वाचवायला धावून आले असता त्यांनाही या आरोपींनी मारहाण केली. मला मारहाण करत असताना आम्ही कॉलेजचे डॉन आहोत, या गावात रहायचे तर आम्हाला नडायचे नाही. नाहीतर असाच मार खावा लागेल, असे म्हणत धमकी देत परत आमच्या पोरांच्या नादाला लागला तर हातपाय मोडून टाकू, अशी धमकी दिली आणि मोटारसायकलवर निघून गेले.
सिक्युरिटी गार्ड हिवाळे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिसात ब्राम्हणे(पुर्ण नाव माहित नाही), सागर इंगळे, सोनु शिंदे, सागर वायकर व आणखी अनोळखी तिघे यांच्या विरोधात भादंवि कलम 143, 147, 324, 323, 504, 506, 148, 149 तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे 25 आणि कलम 4 प्रमाणे गुरनं.1026/2022 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहेत.