शिवप्रहार न्यूज- श्री साईप्रसादालय व लाडु प्रसाद वाटपास जिल्‍हाधिकारी यांची परवानगी…

शिवप्रहार न्यूज- श्री साईप्रसादालय व लाडु प्रसाद वाटपास जिल्‍हाधिकारी यांची परवानगी…

श्री साईप्रसादालय व लाडु प्रसाद वाटपास जिल्‍हाधिकारी यांची परवानगी…

शिर्डी -

            दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ पासुन श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरीता खुले करण्‍यात आलेले असून कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर संस्‍थानचे श्री साईप्रसादालय बंद ठेवण्‍यात आलेले होते. संस्‍थानच्‍या वतीने श्री साईप्रसादालय व लाडू प्रसाद वाटप सुरु करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी अहमदनगर यांच्‍याकडे प्रस्‍ताव पाठवुन पाठपुरवा करण्‍यात आला होता. या प्रस्‍तावास जिल्‍हाधिकारी यांची परवानगी मिळाली असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

              श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. पुन्‍हा राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोंबर २०२१ पासून काही अटी शर्तीवर धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले होते. त्‍यानुसार श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले आहे. परंतु अहमदनगर जिल्‍ह्यातील कोविड रुग्‍णांची संख्‍या लक्षात घेवुन संस्‍थानचे श्री साईप्रसादालय व भाविकांना लाडू वाटप बंद ठेवण्‍याबाबात जिल्‍हाधिकारी तथा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, मदत व पुनर्वसन शाखा, अहमदनगर यांनी आदेश पारित केलेले होते. मात्र साईभक्‍त व शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍याकडून श्री साईप्रसादालय सुरु करण्‍याबाबत वारंवार मागणी होत होती. त्‍यानुसार संस्‍थानच्‍या वतीने दिनांक ०८ नोव्‍हेंबर २०२१ व दिनांक २३ नोव्‍हेंबर २०२१ रोजी जिल्‍हाधिकारी यांना प्रस्‍ताव सादर करण्‍यात आलेला होता. त्‍या प्रस्‍तावास अनुसरुन दिनांक २३ नोव्‍हेंबर २०२१ रोजी जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाची जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली बैठक घेण्‍यात येवुन भाविकांसाठी श्री साईप्रसादालय व लाडु प्रसाद वाटपास काही अटी शर्तीवर परवानगी देण्‍यात आलेली आहे.  

             तरी दिनांक २६ नोव्‍हेंबर २०२१ रोजी पासुन श्री साईप्रसादालय भाविकांना प्रसाद भोजनाकरीता सुरु करण्‍यात येणार असून सर्व साईभक्‍तांनी कोवीड-१९ च्‍या नियमांचे पालन करुन प्रसाद भोजनाचा लाभ घ्‍यावा. तसेच सर्व साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.