शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात फसवणूक; डॉक्टरच्या प्लॉटवर बांधली इमारत…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात फसवणूक; डॉक्टरच्या प्लॉटवर बांधली इमारत…

श्रीरामपुरात फसवणूक; डॉक्टरच्या प्लॉटवर बांधली इमारत…

    श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- पुण्यात राहणारे डॉक्टर श्रीरामपुरात आपल्या प्लॉटवर भेट द्यायला आले असता त्यांच्या प्लॉटवर चक्क इमारत उभी राहील्याचे त्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी रजिस्ट्रार कचेरीत जाऊन चौकशी केली असता खोटे कागदपत्र करून, परस्पर सदर प्लॉट आपला असल्याचे भासवून ,पुढे त्याची दोनदा विक्री केल्याचे आढळून आले आहे. सदर डॉक्टरांच्या फिर्यादीवरून श्रीरामपुरातील चौघा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       याबाबत, डॉ. संपत बाबुराव केदारे, वय-६३, निवृत्त वैद्यकीय अधिकारी हे चाकण, ता. खेड, जि.पुणे येथे राहतात. श्रीरामपुरात त्यांनी १९९३ साली २९८.१२५ चौ.मी.चा प्लॉट खरेदी केला होता. पुण्याला रहायला असल्याने त्यांचे श्रीरामपुरात येणे क्वचित व्हायचे. ०३ एप्रिलला ते श्रीरामपुरात आले असता त्यांच्या प्लॉटवर पक्के बांधकाम केलेली साई संकल्प नावाची इमारत दिसून आली. त्यामुळे त्यांनी रजिस्ट्रार कचेरीत जाऊन माहिती घेतली असता सदर प्लॉट आपल्याच नावाचे असल्याचा लेखी अभिप्राय रजिस्ट्रार कार्यालयाने दिला. 

     मात्र आपल्या प्लॉटवर उभी असलेल्या इमारतीबाबत आपण भूमिअभिलेख कार्यालयात चौकशी केली असता रविंद्र पांडे यांनी खोटे कागदपत्र तयार करून सदरचा प्लॉट त्यांच्या मालकीहक्काचा असल्याचे भासवून,त्या प्लॉटची बाळासाहेब नेटके यांना विक्री केली आणि नंतर बाळासाहेब नेटके यांनी हा प्लॉट सुरेश बिडवे यांना विक्री केल्याचे समजले आणि सुरेश बिडवे यांनी सदर जागा ही स्वतःच्या मालकीचे असल्याचे समजून त्यावर साई सकंल्प इमारत बांधली.

     दरम्यान रविंद्र पांडे यांनी सदर प्लॉटचे खोट्या मालकीहक्काचे कागदपत्र विशाल साळुंके यांच्यामार्फत नगरपरिषदेत मंजूर आराखड्यात सुधारित आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना खोटी कागदपत्रे सादर करून ही मिळकत आपल्या मालकीची असल्याचे दर्शवून बिगरशेती परवानगी मिळवली. याच परवानगीच्या आधारे सदर जागा विक्री करत सुमारे या प्लॉटची सद्याच्या बाजारभावाची किमत रू. १५ लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

      फिर्यादी डॉ. संपत केदारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रविंद्र मोतीलाल पांडे, विशाल साळुंके ॲन्ड असोसिएटस्, बाळासाहेब मुरलीधर नेटके, सुरेश बापूराव बिडवे यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.