शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात रामनवमी यात्रेमध्ये महिलेचे मंगलसूत्र चोरले..

श्रीरामपुरात रामनवमी यात्रेमध्ये महिलेचे मंगलसूत्र चोरले..
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- वैजापूर येथून श्रीरामपूरमध्ये श्रीरामनवमी यात्रेमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेचे चोरटयांनी मंगळसूत्र कट करून,चोरून नेण्याचा प्रकार रात्री घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कल्पना संदीप कुंदे, वय-४१, रा. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर या श्रीरामनवमी यात्रेनिमित्त श्रीरामपुरात आल्या असता त्या आपली मुलगी अनिशा व मुलीची सासू संगिता आदिक यांच्याबरोबर यात्रेमध्ये खरेदी करत होत्या. मेनरोडवरील महावीर स्तंभाजवळ खरेदी करत असतांना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून कल्पना कुंदे यांच्या गळयातील ०५ ग्रॅमचे मंगळसूत्र कशानेतरी कट करून चोरून पसार झाला. याप्रकरणी कल्पना कुंदे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात मंगळसूत्र चोराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. शिंदे हे करीत आहेत.
दरम्यान असाच चोरीचा प्रकार मेनरोडवरील आयकॉन कॉम्प्युटरजवळ यात्रेमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेबाबत घडला होता. या महिलेच्या मुलाच्या हातातील सोन्याचेकडे एका महिलेने काढून घेतले होते. परंतु तात्काळ मुलाच्या आईच्या लक्षात हा प्रकार आल्याने तिने सदर महिलेला धाऱ्यावर धरत तिच्याकडून हे कडे पुन्हा परत घेतले होते.
तरी यात्रोत्सव काळात गर्दीचा फायदा घेवून चोरटे हात साफ करताना दिसत असून नागरीकांनी यात्रेमध्ये खरेदीसाठी जातांना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.