शिवप्रहार न्यूज- चिथावणीखोर भाषण प्रकरणी अबु आजमी निर्दोष...
चिथावणीखोर भाषण प्रकरणी अबु आजमी निर्दोष...
मुंबई- द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी तेरा वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या खटल्यात समाजवादी पार्टीचे अबू आसिम आझमी यांची नुकतीच निर्दोष मुक्तता झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या रेकॉर्डिंगच्या सीडींपैकी एक रिकामी निघाली व एक सीडी न्यायालयातील लॅपटॉपमध्ये चालु झाली नाही. त्याचबरोबर एक कॅसेट चालवण्यासाठी न्यायालयात काही साधनच नव्हते. तसेच पोलिसांना न्यायालयात गुन्हाही सिद्ध करता आला नाही. त्यामुळे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आझमीला त्यांच्याविरोधातील आरोपांतून निर्दोष मुक्त केले.३ फेब्रुवारी २००८ रोजी समाजवादी पक्षाने शिवाजी पार्कवर सभा घेतली होती. त्यावेळी आझमी यांनी मनसेच्या परप्रांतीयांविरोधातील राजकारणावर टीका केली. भाषणादरम्यान त्यांनी महाराष्ट्रवासी व उत्तर प्रदेशवासीयांमध्ये जातीय तेढ निर्माण करणारी चिथावणीखोर विधाने केली.तसेच दुसऱ्या दिवशी सपा कार्यकर्त्यांनी मनसे व राज ठाकरे यांचे पोस्टर व बॅनर फाडले असा आरोप होता. आझमी यांच्या भाषणाची शहानिशा केल्यानंतर १० फेब्रुवारी २००८ रोजी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते मात्र एफआयआर नोंदवण्यात एक हप्ता विलंब झाल्याविषयी योग्य स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम ११७ (लोकांनी गुन्हा करण्यात भाग घेणे) लावले असले तरी किमान दहा जणांना यात आरोपी करणे आवश्यक असताना तसे करण्यात आले नाही. आरोपींचे भाषण हे राजकीय स्वरूपाचे होते आणि ते महाराष्ट्रातील लोकांच्या विरोधातील नव्हे तर मनसे व त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात होते हे सिद्ध झाले आहे. एक लहान कॅसेट चालवणारे साहित्त्यही नाही.म्हणुन रेकॉर्ड केलेले ते भाषण आरोपीचे आहे की नाही याविषयी संशय निर्माण होतो असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने अबु आझमी यांची निर्दोष मुक्तता केली.