शिवप्रहार न्यूज- 4 गावठी कट्टे, 16 जिवंत गोळ्यांसह 22 वर्षाचा आरोपी पकडला…
4 गावठी कट्टे, 16 जिवंत गोळ्यांसह 22 वर्षाचा आरोपी पकडला…
नगर (प्रतिनिधी) - नगरच्या तारकपूर बसस्टॅन्डवर गावठी कट्टे विकण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती नगरच्या एलसीबीला कळाल्यानंतर एलसीबीचे पोलीस नगर बसस्थानकावर प्रवासी बनून उभे राहीले. थोडयाच वेळात पाठीला काळी स्लॅग लावलेला आरोपी तेथे आला आणि पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले. मध्यप्रदेशमधून आलेल्या या आरोपीकडे ४ गावठी कट्टे आणि १६ जिवंत काडतुसे आढळून आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील व जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील एलसीबीचे पोनि. अनिल कटके यांना आगामी गणेशोत्सव अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत सुचना देवून मार्गदर्शन केले. नमुद सुचना व मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अनिल कटके हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एक इसम गावठी कट्टे व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी अहमदनगर येथे तारकपुर एसटी स्टॅण्ड परिसरात येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि / अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई / सोपान गोरे, सफौ/ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ / देवेंद्र शेलार, पोना /विशाल दळवी, शंकर चौधरी, पोकॉ/ शिवाजी ढाकणे, आकाश काळे, मपोना / भाग्यश्री भिटे व 'ज्योती शिंदे अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी तारकपुर बस स्टॅण्ड येथे जावून सापळा लावुन प्रवासी म्हणुन बसची वाट पाहत आहेत असा बनाव करुन थांबलेले असतांना थोड्याच वेळात एक संशयीत इसम पाठीवर काळ्या रंगाची सॅक घेवुन येताना दिसला. पोलीस पथकास संशय आल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीत इसमास ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नावे १) रितेंद्र सिंह बरनाला वय २२, रा. उमरती, जिल्हा बडवानी, राज्य मध्य प्रदेश हल्ली रा. धुलकोट, ता भगवानपुरा, जिल्हा खरगोन, राज्य मध्य प्रदेश असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये चार (०४) गावठी बनावटी कट्टे, सोळा (१६) जिवंत काडतूसे असा एकूण १,३१,२००/- रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने तो. जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या चार गावठी कट्टे व सोळा जिवंत काडतुसे या बाबत विचारपुस करता त्याने सर्व गावठी कट्टे मी स्वतः माझे मुळगांवी तयार करुन, विक्री करण्यासाठी आणलेले आहेत अशी कबुली दिली.
नमुद इसम हा अहमदनगर शहर परिसरात चार (०४) गावठी कट्टे (पिस्टल) व सोळा (१६) जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत सफौ/ राजेंद्र देवमन वाघ ने. स्थागुशा यांनी तोफखाना पोस्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही तोफखाना पोस्टे करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.