शिवप्रहार न्यूज- श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची तयारी पुर्ण. तसेच विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

शिवप्रहार न्यूज- श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची तयारी पुर्ण. तसेच विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची तयारी पुर्ण. तसेच विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

*शिर्डी –*

          श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०४ वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असून मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व सर्व धर्म समभाव आणि स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव यावर आधारित “श्री साई दरबार” हा भव्‍य देखावा प्रवेशव्‍दारावर उभारण्‍यात आला आहे. तसेच उत्‍सवकाळात विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

                  श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, जगभरात श्री साईबाबांचे लाखो साईभक्‍त आहेत. हे साईभक्‍त श्री पुण्‍यतिथी सोहळ्यानिमित्‍त आपल्‍या सदगुरुंचा आशिर्वाद ग्रहण करण्‍याकरीता शिर्डीला येतात. त्‍यामुळे श्रींच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरासह चावडी समोर, मारुती मंदिर ते शामसुंदर हॉल, समाधी मंदिराच्‍या दक्षिण बाजुकडील पालखी मार्ग, साई उद्यान परिसर, जुना पिंपळवाडी रोड दर्शनरांग व नविन श्री साईप्रसादालय परिसर आदि ठिकाणी ५२ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे. तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) येथे ०४ हजार ५०० चौरस फुटाचा मंडप उभारण्‍यात आला आहे.

          तसेच साईभक्‍तांकरीता सुमारे १५० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकीटे तयार करण्‍यात आलेले असून उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी श्री साईनाथ मंगल कार्यालय, व्‍दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्‍प्‍लेक्‍स, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत व सर्व निवासस्‍थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आलेले आहेत. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास अतिरिक्‍त लाडू विक्री केंद्र उभारण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्‍प्‍लेक्‍स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्‍या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. उत्‍सव काळात भक्‍तांच्‍या सोयीसाठी दर्शनरांग, मंदिर परिसर, साईआश्रम व नविन श्री साईप्रसादालय आदि ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असून तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, नविन भक्‍तनिवासस्‍थान व नविन श्री साईप्रसादालय येथे रुग्‍णवाहीका तैनात ठेवण्‍यात येणार आहे. तसेच संस्‍थानच्‍या वतीने श्री साईबाबा मंदिर, मंदिर परिसर, सर्व निवासस्‍थाने, श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी सुरक्षा व्‍यवस्‍था चोख ठेवण्‍यात येणार आहे.

          श्री पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त समाधी मंदिर व मंदिर परिसरात, व्‍दारकामाई, चावडी व गुरुस्‍थान या ठिकाणी हैद्राबाद येथील दानशुर साईभक्‍त‍ ए.महेश रेड्डी यांच्‍या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. तसेच मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व सर्व धर्म समभाव आणि स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवावर आधारित “श्री साई दरबार” हा भव्‍य देखावा उभारण्‍यात आला आहे. याबरोबरच उत्‍सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असून उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी मंगळवार दिनांक ०४ ऑक्‍टोबर रोजी दुपारी ४.०० वाजता ह.भ.प.सौ.अंजली श्रीकृष्‍ण जोशी, डोंबीवली यांचा कीर्तनाचा कार्यक्रम तर रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत श्री.संजय गिरीदास जोशी, नांदेड यांचा गीत रामायण कार्यक्रम होणार आहे. उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी बुधवार दिनांक ०५ ऑक्‍टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.सौ.अंजली श्रीकृष्‍ण जोशी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम व रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत श्री.निरजा पालवी, भोपाल यांचा भजन संध्‍या हा कार्यक्रम होणार आहे. उत्‍सवाच्‍या तृतीय दिवशी गुरुवार दिनांक ०६ ऑक्‍टोबर रोजी दुपारी ०४.०० वाजता ह.भ.प.सौ.अंजली श्रीकृष्‍ण जोशी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम व रात्रौ ०७.३० ते ०९.१५ यावेळेत श्री.मधुसूदन गोविंद भुवड, बोरिवली यांचा साई व्‍दारकामाई गीत संगीत नृत्‍य हा कार्यक्रम होणार आहे. उत्‍सवाच्‍या सांगता दिनी शुक्रवार दिनांक ०७ ऑक्‍टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.सौ.अंजली श्रीकृष्‍ण जोशी यांचा काल्‍याचे कीर्तनाचा कार्यक्रम तर रात्रौ ७.३० ते ०९.४५ यावेळेत सुप्रसिध्‍द गायिका श्री.गोविंद सखराम देशपांडे यांचा सुगम संगीत कार्यक्रम होणार आहे. उत्‍सवकाळात कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराचे शेजारील स्‍टेजवर आणि निमंत्रीत कलाकारांचे कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार आहे. 

                  याबरोबरच दिनांक ०४ ऑक्‍टोबर रोजी होणा-या अखंड पारायणात भाग घेवु इच्छिणा-या साईभक्‍तांनी आपली नावे दिनांक ०३ ऑक्‍टोबर रोजी दुपारी ०१.०० ते ०५.३० यावेळेत देणगी कक्षात नोंदवावीत. त्‍याच दिवशी सायं.०५.३५ वाजता समाधी मंदिराच्‍या स्‍टेज येथे सोडत पध्‍दतीने पारायण वाचक भाविकांची निवड करण्‍यात येईल. भिक्षा झोळी कार्यक्रमात भाग घेवु इच्छितात त्‍यांनी आपली नावे दिनांक ०४ ऑक्‍टोबर रोजी सकाळी ०८.०० ते ११.३० यावेळेत देणगी कक्षात नोंदवावीत. त्‍याच दिवशी दुपारी ०१.१० वाजता समाधी मंदिराच्‍या स्‍टेजवर सोडत पध्‍दतीने भाग्‍यवान भक्‍तांची निवड करण्‍यात येईल. ज्‍या भक्‍तांची नावे निवडण्‍यात आले असेल त्‍याच भक्‍तांना भिक्षाझोळी घेता येईल, इतरांना भाग घेता येणार नाही. तसेच उत्‍सवाच्‍या मुख्‍यदिवशी ०५ ऑक्‍टोबर रोजी रात्रौ १०.०० ते ०५.०० यावेळेत होणा-या कलाकारांच्‍या हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकारांनी आपली नावे समाधी मंदिराशेजारील अनाऊंसमेंट रुममध्‍ये मंदिर कर्मचा-याकडे आगाऊ नोंदवावीत, असे सांगुन उत्‍सवाच्‍या कालावधीत श्री साईसत्‍यव्रत पुजा (सत्‍यनारायण पुजा), अभिषेक पुजा व वाहन पुजा बंद ठेवण्‍यात येणार असल्‍याचे ही श्रीमती बानायत यांनी सांगितले.

          हा उत्‍सव यशस्‍वरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश सुधाकर यार्लगड्डा, सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहे.