शिवप्रहार न्यूज- महाशिवरात्रीपासून शिर्डी संस्थानकडुन आरतीच्या वेळेत बदल

महाशिवरात्रीपासून शिर्डी संस्थानकडुन आरतीच्या वेळेत बदल…
शिर्डी-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या व्यवस्थापन मंडळाने पुर्वीप्रमाणे श्रींची काकड आरतीची वेळ सकाळी ०५.१५ वा.व शेजारतीची वेळ रात्रौ १०.०० वाजता करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला असून दिनांक ०१ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्रीच्या औचित्यावर श्रींच्या आरत्याच्या यावेळेत बदल करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
श्रीमती बानायत म्हणाल्या, श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात प्रथेप्रमाणे विविध पुजा-अर्चा नियमित केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने काकड आरती, माध्यान्ह आरती, धुपारती व शेजारती ह्या आरत्या विधींचा समावेश असून ह्या सर्व आरत्यांना साईभक्त व ग्रामस्थ मोठ्या संखेने हजेरी लावतात. तसेच ह्या आरत्यांचे अनन्यसाधारण महत्व असून ह्या आरत्या श्री साईबाबा समाधी मंदिरात आजतागायत अविरतपणे सुरु आहे. सन २००८ गुढीपाडव्यापासुन श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील श्रींची काकड आरतीच्या वेळेत बदल करुन पहाटे ०४.३० वाजता व शेजारती रात्रौ १०.३० वाजता करण्याचा निर्णय तात्कालीन व्यवस्थापन मंडळाने घेतला होता. त्यानुसार श्रींच्या आरत्यामध्ये बदल करण्यात येवुन दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत ही काहीसा बदल करण्यात आला होता. परंतु साईभक्त व ग्रामस्थांकडुन श्रींची काकड आरती व शेजारतीच्या वेळेत पुर्वीप्रमाणे बदल करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यानुसार संस्थानचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व विश्वस्त मंडळाने दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजीच्या सभेत श्रींची काकड आरती व शेजारतीच्या वेळेत बदल करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला.
काकड आरती व शेजारती या आरत्यांच्या वेळेत बदल होत असल्यामुळे श्री साईबाबा मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत ही काहीसा बदल करण्यात येत असुन यामध्ये पहाटे ४.४५ वाजता समाधी मंदिर उघडुन पहाटे ५.०० वाजता भुपाळी रेकॉर्ड सुरु होईल. पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, सकाळी ५.५० वाजता श्रींचे मंगलस्नान व त्यानंतर शिरडी माझे पंढरपुर ही आरती होईल. सकाळी ६.२५ वाजता दर्शनास प्रारंभ होईल. दुपारी १२.०० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होईल. सुर्यास्ताचे वेळी श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होवुन रात्रौ १०.४५ वाजता समाधी मंदिर बंद करण्यात येईल.
उपरोक्तप्रमाणे समाधी मंदिरातील श्रींच्या आरत्यांच्या व दैनंदिनी कार्यक्रमांचे वेळेत बदल करण्यात येणार असून हे बदल दिनांक ०१ मार्च २०२२ पासुन सुरु होतील, यांची भाविकांनी व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी, असे ही श्रीमती बानायत यांनी सांगितले. तसेच या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा व सर्व साईभक्तांनी व शिर्डी ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थान व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष, विश्वस्त व संस्थान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.