शिवप्रहार न्यूज - गुन्हा घडूच नये म्हणून कर्जत पोलिसांचा प्रामाणिक प्रयत्न-प्रशांत खैरे; महिला सशक्तीकरणात महिला- विद्यार्थिनींशी संवाद...
गुन्हा घडूच नये म्हणून कर्जत पोलिसांचा प्रामाणिक प्रयत्न-प्रशांत खैरे; महिला सशक्तीकरणात महिला- विद्यार्थिनींशी संवाद...
कर्जत दि.४
कर्जत पोलिसांनी आपल्या कामातून सर्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.कायम नवनवीन उपक्रमातून महिला-मुलींना अभय देण्याचे काम केले आहे.गुन्ह्यांचे तपास लावण्याचे काम पोलिसांकडून तर केले जातेच मात्र गुन्हेच घडू नयेत यासाठी कर्जत पोलिसांचा प्रामाणिक प्रयत्न असतो.कुणावर अन्याय होत असेल तर कर्जत पोलीस न्याय मिळवून देतील.जर कुणाच्या काही अडचणी असतील तर जिल्हा पोलीस यंत्रणा सदैव आपल्या पाठीशी उभा असेल' असे मत अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी व्यक्त केले.
कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या 'महिला सशक्तीकरण' कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 'बांधिलकी नारी सन्मानाची' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.पोलीस निरीक्षक यादव यांच्या अवहानातून तालुक्यातील अनेक गावांत तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी योगदान देणाऱ्यांना अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव म्हणाले,'कर्जत पोलिसांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या उपक्रमातून महिला-मुलींना सक्षम आणि निर्भय करण्याचे महत्त्वपुर्ण काम केले. पोलीस निरीक्षक यादव यांनी कर्जत पोलिसांची मान उंचावली आहे. अनेक समाजहिताची कामे कर्जत पोलिसांमुळे मार्गी लागली आहेत. अवैध सावकारकी,सीसीटीव्ही यंत्रणा, महिला सक्षमीकरण आदी कार्यक्रमांमुळेच पोलिसांबद्दलची भीती कमी झाली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले,'महिला-मुलींनी बोलते व्हावे,त्यांनी निर्भीड बनावे.मनातील भीती कमी व्हावी म्हणून तालुक्यातील शाळा महाविद्यालयात जाऊन मुलींना सक्षमीकरणाचे धडे दिले.पोलीस स्टेशन हे मुलींना जणू आपले माहेरघर वाटावे व त्यांची भीती कमी व्हावी यासाठी पोलीस ठाण्यात सहली घडवल्या.अनेक ठिकाणी तक्रारपेट्या बसवल्या. अन्याय झाला तरी महिला-मुली भीतीपोटी तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हत्या मात्र आवाहनानंतर गुन्हे दाखल झाले, जन्मठेपेसारख्या शिक्षा झाल्या.
यावेळी विद्यार्थिनी, शिक्षिका व महिलांनी आपली मनोगते व्यक्त करून कर्जत पोलिसांबद्दल ऋण व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक गावाचे सरपंच, नगर पंचायतीचे पदाधिकारी, महिला व हजारो मुली व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होत्या.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी तर आभार आभार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मानले.
*तक्रारीनंतर 'ते ' टवाळखोर यादवांच्या रडारवर!*
कार्यक्रमादरम्यान पोलीस निरीक्षक यादव यांनी उपस्थित मुलींना तक्रारी चिठ्यांवर लिहिण्यास सांगितल्या होत्या.यावर तक्रारीच्या काही चिठ्या यादव यांनी वाचून दाखवल्या तर यामध्ये काही मुलींनी आपणास मुले त्रास देत असल्याचे लिहून संबंधित टवाळखोरांच्या नावांचा उल्लेख केला होता.यावर पोलीस निरीक्षकांनी संबंधितांचा तात्काळ बंदोबस्त करण्याचा शब्द दिला.
*महिला मुलींना मिळाले लढण्याचे बळ!*
पोलीस यंत्रणेच्या वतीने कर्जत येथे महिला सक्षमीकरणाचा आगळावेगळा कार्यक्रम पहिल्यांदाच पार पडला.सामाजिक बांधिलकी आणि महिला-मुलींना खऱ्या अर्थाने बळ देणारा हा कार्यक्रम आहे.असे कार्यक्रम प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वतीने राबवण्यात यावेत.महिला सशक्तीकरणासाठी कर्जत पोलीसांनी घेतलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी आदर्श आहे.