शिवप्रहार न्यूज- श्रीरामनवमी यात्रोत्सवातील पाळण्यांचा प्रश्न सुटेना...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामनवमी यात्रोत्सवातील पाळण्यांचा प्रश्न सुटेना...

श्रीरामनवमी यात्रोत्सवातील पाळण्यांचा प्रश्न सुटेना...

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- येत्या ३० मार्चला भरणार्या श्रीरामपूरच्या ९४ व्या श्रीरामनवमी यात्रेस येणाऱ्या पाळण्यांच्या लिलावाचा तिढा आज शुक्रवारीही न सुटल्याने यात्रेतील या पाळण्यांचा पाळणा हलतो की नाही? अशी साशंकता व्यक्त करण्यात येत असून श्रीरामपूरच्या यात्रा कमिटीने हे पाळणे चालवायला घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी ३४ लाख ११ हजार १०० रूपयांना थत्ते ग्राऊंड येथे येणाऱ्या पाळण्यांचे टेंडर देण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी या रक्कमेच्या पुढे बोली बोलावी, अशी भूमिका नगरपालिकेने घेतली होती. मात्र, १५ लाखांपासून बोली सुरू करावी, अशी पाळणावाल्यांची मागणी होती. ती पालिकेने अमान्य केल्याने पहिला लिलाव झाला नाही. म्हणून आज शुक्रवारी २४ मार्चला दुपारी १२.३० ला फेर लिलाव झाला. या फेरलिलावामध्ये अडीच लाख डिपॉझिट भरणारे लिलावधारक उपस्थित होते.
   मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पाळणावाल्यांची मागणी विचारात घेता ३४ ऐवजी ३१ लाख ११ हजार एवढ्या रक्कमेच्यापुढे बोली बोलावी, अशी तयारी दर्शवली. मात्र, गेल्यावर्षीप्रमाणे १७ लाखांपासून बोली सुरू करावी, अशी मागणी पाळणावाल्यांची होती. परंतु, एवढ्या कमी रक्कमेत बोली ठेवता येणार नाही, अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतल्याने आणि लिलावधारक १७ लाखांच्यापुढे जायला तयार नसल्याने आजचा ही फेरलिलाव झाला नाही. त्यामुळे श्रीरामपूरच्या श्रीरामनवमी यात्रेसाठी थत्तेग्राऊंडवर येणाऱ्या पाळण्यांचा प्रश्न आजही मार्गी लागला नाही. यामुळे आज-उद्या जर पाळण्याबाबत निर्णय नाही झाला तर यंदाच्या श्रीरामनवमी यात्रेत पाळण्यांची संख्या किती राहील? किंवा काय? हे सांगता येणार नाही, अशी स्थिती आहे.
  दुसरीकडे श्रीरामनवमी यात्रा कमिटीने हे पाळणे चालवायला घ्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. राहुरी येथील यात्रेत यात्रा कमिटी पाळणे चालवायला घेते. साधारणपणे ७ ते ८ लाख रूपयांना पाळण्यावाल्यांकडून यात्रा कमिटी घेते. पैकी निम्मी अर्धी किंमत जागा मालकाला दिली जाते आणि निम्मी रक्क्म यात्रा कमिटी इतर कार्यक्रमांना 'ठेवते. याठिकाणी पाळण्याचे दर ४० ते ६० रूपये घेतले जातात. राहात्यातही अशाचप्रकारे यात्रा कमिटी पुढाकार घेते. याच धर्तीवर श्रीरामपुरातील यात्रा कमिटीने यंदा थत्ते ग्राऊंडवरील श्रीरामनवमीचे पाळणे चालवायला घ्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता यात्रा कमिटीने जर पाळणे चालवायला घेतले तर चांगली गोष्ट आहे त्यासाठी यात्रा कमिटीला आज पाळणे चालवायला घेण्यासंदर्भात लेखी पत्र देणार आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे जर यात्रा कमिटीने पाळणे चालवायला घेतले तर दरवर्षी पाळण्याच्या ठेक्यावरून, लिलावावरून होणारा संघर्ष कायमस्वरूपी बंद होईल. शिवाय, श्रीरामपूरच्या नागरीकांनाही ३० ते ५० रूपयांच्या आत पाळण्याचा आनंद लुटता येईल. त्यामुळे यात्रा कमिटीने शहराच्या हितासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.